झटपट वजन कमी करणे ही काही लोकांसाठी महत्वपूर्ण गरज ठरली आहे. आजच्या या युगात जिथे सर्वच काही एकदम झटपट आणि वेगाने होते आहे तिथे झटपट वजन कमी करायला कुणाला नाही आवडणार.
तरुण पिढी फोटो मध्ये चांगले दिसण्यासाठी,एखाद्या ड्रेस मध्ये फिट दिसले पाहिजे, vacation साठी फोटो काढायला फिट दिसले पाहिजे यासाठी आणि असे अनेक प्रसंग आहेत जिथे झटपट वजन कमी करण्याची गरज पडते. अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे कुठे, चांगले आणि फिट दिसणे कुणाला आवडणार नाही.
या सर्व विचारांमगे एक विचार मात्र दुर्लक्षित केला जातो. तो म्हणजे की झटपट वजन कमी करणे हे कितपत योग्य, सुरक्षित आणि शक्य आहे?
थोडे स्पष्टच बोलतो. तुम्ही बऱ्याच वेळा १० दिवसांत वजन कमी करायचे आहे, महिन्याभरात वजन कमी करायचे आहे या दृष्टीने बऱ्याच गोष्टी ट्राय करून बघितल्या असतील. जसे की क्रॅश डायट, म्हणजे कमी जेवण करून किंवा काही जण तर यासाठी उपाशी सुद्धा राहतात.
त्यानंतर एखादा विडियो किंवा रील बघून ज्यामध्ये ‘एवढ्या एवढ्या दिवसांत एवढे वजन कमी करा’ अशी जाहिरात असते आणि ती बघून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमची विवेक बौद्धि बाजूला ठेवून करत बसता.
आपण ज्या समाजात राहतो जिथे वेग तर वाढतो आहे पण सहनशीलता आणि संयम हा कमी होत चालला आहे. त्यामुळे अशा खोटी आणि स्वप्नवत गोष्टींना बळी पडणे सहाजिक आहे.
पण या सर्व भुलथापा ठरणाऱ्या गोष्टींच्या मागचे सत्य आणि वास्तव हे वेगळेच असते. याचाच सुगावा तुम्हाला या ब्लॉग मध्ये मिळणार आहे.
या ब्लॉग मध्ये तुम्हाला झटपट वजन करण्याच्या संबंधी अनेक गोष्टी माहीत होणार आहे. जसे की जेव्हा तुम्ही झटपट पद्धतीने वजन करता तेव्हा तुमच्या शरीरात काय होते, असे केल्यावर खरंच वजन कमी होते का, वजन कमी झालेच तर ते किती टिकते आणि हे सर्व किती सुरक्षित आहे.
त्यामुळे झटपट वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही उपाशी राहत असाल, तुमच्या क्षमते पेक्षा जास्त व्यायाम करत असाल किंवा यासाठी कोणताही प्रयत्न करत असाल तर त्या आधी हा ब्लॉग नक्की वाचा.
झटपट वजन कमी करणे म्हणजे नेमके काय ?
समजा तुम्ही जलद गतीने वजन कमी करायचे ठरवले तेव्हा नकळत नेमके तुम्ही काय ठरवता याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. इथे मी तुम्हाला झटपट वजन कमी करणे म्हणजे नेमके काय हे सांगणार आहे.
झटपट किंवा जलद पद्धतीने वजन कमी करणे म्हणजेच विशिष्ठ (कमी) कालावधी मध्ये लक्षणीयरीत्या तुमच्या शरीराचे वजन कमी करणे. ही झाली सोपी आणि सरळ व्याख्या.
आता साधारण लोकांना वरची व्याख्या साधी, सरळ आणि सोपी वाटेल. पण डॉक्टर किंवा तत्सम ज्ञान असणाऱ्या लोकांना यात बरीच विसंगती आणि अशक्य अशी गोष्ट वाटेल. ही गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही उपाशी राहता, क्रॅश डायट करता, तीव्र व्यायाम करता. शेवटी हीच समस्या होऊन बसते.
ती कशी आणि का समस्या होऊ शकते हे तुम्हाला पुढे कळेलच.
झटपट वजन कमी करणे शक्य आहे का ?
तुम्हाला एखाद्या लग्नाला, फोटो मध्ये किंवा कोणत्या प्रसंगासाठी चांगले आणि फिट दिसायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर वजन कमी करण्याचे नक्कीच ठरवले असेल. पण तुम्ही जर साक्षर असाल आणि थोडं फार विज्ञाना वर विश्वास असेल तर तुम्हाला तुमच्या या निर्णयाविषयी एक प्रश्न पडला पाहिजे.
तो म्हणजे झटपट वजन कमी करणे शक्य आहे का? तर याचे सरळ उत्तर हो आहे. जलद गतीने वजन कमी करणे शक्य आहे. पण महत्वाचा प्रश्न हा आहे की हे कितपत योग्य आहे.
काही क्षणिक सुखासाठी तुम्ही तुमची खरी संपत्ति असलेल्या शरीरासोबत खरंच खेळणार आहात का ?
मी असं एकदम एवढ टोकाचं का बोलतोय असं तुम्हाला वाटत असेल. याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. पण त्यासाठी मला हळू हळू सर्व मुद्दे उलगडावे लागणार आहे.
जलद गतीने वजन कमी करणे किती योग्य आहे ?
तुम्ही झटपट पद्धतीने वजन कमी करणे किती योग्य आहे याचे सरळ उत्तर तुम्हीच या ब्लॉग च्या शेवटी ठरवा, ते तुमच्यावर सोडतो. कारण ब्लॉग च्या शेवटी पर्यंत तुम्हाला याचे उत्तर भेटणार आहे. ते उत्तर भेटण्यासाठी मला तुम्हाला काही मुद्दे स्पष्ट करून द्यायचे आहे.
यासाठी मी अगोदर मीनेसोटा स्टारवेशन एक्सपेरीमेन्ट चा दाखला देईल.
दुसऱ्या महायुद्धा दरम्यान अनेक देशांचे सैनिक उपासमारीमुळे मरु लागले. हीच समस्या सोडवण्यासाठी १९४४-४५ च्या दरम्यान मीनेसोटा स्टारवेशन एक्सपेरीमेन्ट केला गेला. या प्रयोगाचा उद्देश होता की मानवांवर जर दीर्घकाळ उपासमारीची वेळ आली आणि त्यामुळे शरीररीक आणि मानसिक विकार उद्भवले तर त्यानंतर त्या लोकांचे पुनर्वसन आणि उपचार कसा केला जावा याचं उत्तर शोधणं.
जरी हा प्रयोग वजन कमी करण्यासंदर्भात नसला तरी याचे निष्कर्ष हे आपण जलद वजन कमी करण्यासाठी क्रॅश डायट किंवा एकदम कॅलरीज कमी करणे या गोष्टी केल्यास काय होऊ शकते याचा अंदाज नक्कीच देतात.
हा प्रयोग १९४४-४५ दरम्यान आंसेल की (Ancel Key) यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात आला. एकूण ३६ volunteers व्यक्तींचा यामधे सहभाग होता.
प्रयोगाचा भाग म्हणून प्रत्येक व्यक्तिला त्यांना लागत असलेला आहार म्हणजेच कॅलरीज पेक्षा ५० टक्के कमी आहार किंवा कॅलरीज देण्यात आल्या.
याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर झाला. प्रयोगाचे निकाल आणि निष्कर्ष आंसेल की आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९५० मध्ये बयोलॉजी ऑफ ह्यूमन स्टारवेशन (The Biology of Human Starvation) च्या दोन आवृत्ती मध्ये प्रकाशित केले. तुमच्या माहिती साठी थोडक्यात या निष्कर्षांचा आढावा घेऊयात.
प्रयोगातील व्यक्तींवर झालेले शारीरिक परिणाम
सर्व ३६ volunteers ज्या स्थितिमध्ये होते त्यामध्ये त्यांना लागणाऱ्या कॅलरीज पैकी अत्यंत कमी, ५० टक्केच कॅलरीज देण्यात आल्या.
यामुळे पहिला परिणाम असा झाला की शरीराला काम करायला आणि मूलभूत प्रक्रिया जसे पचन, श्वसन पार पाडायला ऊर्जा कमी पडू लागली.
या सर्व परिस्थिति शरीर मिळेल तिथून ऊर्जा मिळवत असते. मग ती तुमची चरबी असेल किंवा स्नायू. या प्रयोगामधील व्यक्तींचे सुद्धा असेच झाले. त्यांचे शरीर स्नायू आणि चरबी यामधून ऊर्जा मिळवू लागले. परिणामी त्यांचे झपाट्याने वजन कमी व्हायला लागले.
वजन कमी होण्याच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही वजन कमी करायचे म्हणता तेव्हा तुमच्या शरीराचे वजन कुठून ही कमी होऊ शकते. मग त्यामध्ये तुमची काही प्रमाणात चरबी कमी होईल आणि काही प्रमाणात तुमचे स्नायू सुद्धा कमी होतील.
प्रयोगातील लोकांचे सुद्धा असेच झाले. त्यांच्या शरीरातील चरबी तर कमी झालीच पण स्नायू देखील कमीआणि कमकुवत व्हायला लागली.
दूसरा परिणाम असा झाला की शरीरात ऊर्जाच कमी असल्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणे या समस्या जाणवू लागल्या.
तीसरा परिणाम झाला तो त्यांच्या बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) वर. आता ऊर्जा नसल्यामुळे मेटाबॉलिक प्रक्रिया कुठून होणार. त्यामुळे volunteers चा बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) ४० टक्क्याने कमी झालेला आढळला.
प्रयोगातील व्यक्तींवर झालेले मानसिक आणि भावनिक परिणाम
या प्रयोगातील volunteers ना फक्त शारीरिक परिणाम नाही तर मानसिक आजार आणि भावनिक परिणामांना देखील सामोरे जावे लागले. बहुतेक volunteers हे खाण्यासाठी काही भेटावे यासाठी अक्षरशः obsessed झाले होते.
त्यांना सतत, नेहमी त्यांच्यासमोर खायला काहीतरी ठेवले असल्याचे भास होत होते. त्याविषयी स्वप्न पडणे, सतत त्याविषयी विचार करणे अशा गोष्टी घडू लागल्या.
सतत जेवणा बद्दलच्या कल्पना करणे, त्या रंगवणे, त्याचाच विचार करणे अशा गोष्टी चालू झाल्या होत्या. काही volunteers ना चिंता, नैराश्य, चिडचिड यासारखी मानसिक आजारांची लक्षणे दिसू लागली.
यो यो इफेक्ट
जेव्हा तुम्ही झटपट वजन कमी करण्याच्या नादात कॅलरीज आणि जेवण कमी करता तेव्हा लक्षणीयरीत्या वजन कमी तर नक्कीच होते. पण मग जेव्हा तुम्ही खूप वजन कमी झाले, त्यामुळे थोडे वाढवूया, या नादात पुन्हा वजन वाढवण्यासाठी नॉर्मल जेवता आणि कॅलरीज घेता, तेव्हा तुमचे वजन पहिल्या पेक्षा किती तरी जास्त वाढते.
यालाच यो यो इफेक्ट म्हणतात.
प्रयोग संपल्यानंतर volunteers च्या बाबतीत हा यो यो इफेक्ट दिसून आला. जेव्हा volunteers ना रीकवर (पूर्ववत) होण्यासाठी सामान्य डायट चालू करण्यात आला तेव्हा त्यांचे वजन प्रयोगा आधी असणाऱ्या वजनापेक्षा किती तरी जास्त वाढल्याचे दिसून आले.
अशा पद्धतीने दीर्घकालीन वजन वाढणे आणि कमी होण्याच्या या सायकल मुळे अनेकदा व्यक्तीला नैराश्य, मेटाबॉलिक डॅमेज आणि सतत निराशा अशा भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच मीनेसोटा स्टारवेशन एक्सपेरीमेन्ट चा हा तीसरा निष्कर्ष महत्वाचा आणि नमूद करण्याजोगा ठरतो.
तुमच्या शरीरात कोणते बदल होतात जेव्हा तुम्ही झटपट वजन कमी करता ?
तुम्ही जर जलद गतीने वजन कमी करायचे ठरवले असेल तर त्या अगोदर तुम्ही हा मजकूर वाचणे आवश्यक आहे. झटपट पद्धतीने वजन कमी करत असताना तुमच्या शरीरात अनेक बदल होत असतात जे तुमच्या शरीरावर दीर्घकाळसाठी परिणाम घडवून आणतात.
या दरम्यान तुम्हाला वजन काट्यावर जरी दिलासा मिळाला तरी तुम्ही जे करताय त्याचा शरीरावर काय परिणाम होतोय हे ही जाणून घेणे महत्वाचे आहे.
कारण कोणताही क्षणिक फायदा तुमच्या दूरगामी होणाऱ्या परिणामपेक्षा मोठा नसतो. म्हणूनच पुढे मी तुम्हाला झटपट वजन करण्याच्या प्रक्रियेत तुमचे शरीर कोणत्या कोणत्या बदलांना सामोरे जाते याची माहिती देणार आहे.
१. पाणी कमी होणे विरुद्ध चरबी कमी होणे
जेव्हा तुम्ही झटपट वजन कमी करण्यासाठी कमी जेवण करायला लागता, उपाशी रहायला लागता किंवा गरजेपेक्षा आणि क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करायला लागता तेव्हा तुमच्या शरीरात लक्षणीय प्रमाणात ऊर्जेची कमतरता आढळते.
अशा वेळी तुमचे शरीर ग्लायकोजेन (glycogen) मधून ऊर्जा घ्यायला सुरुवात करते. ग्लायकोजेन हे एक प्रकारचे साठवलेल्या ऊर्जेचे स्वरूप असते ज्याचा उपयोग एमर्जन्सि मध्ये केला जातो. विशेषकरून जेव्हा तुमच्या शरीरात ऊर्जेची कमतरता आढळते.
आता वास्तव असे आहे की हे ग्लायकोजेन पाण्याशी बाईंड (जोडलेले) केलेले असते. वर सांगितले तसे वजन कमी करण्याच्या या प्रवासात सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये जी ऊर्जेची गरज लागते ती ग्लायकोजेन मधून मिळवली जाते. जेव्हा ग्लायकोजेन उपयोगात आणले जाते तेव्हा त्यापासून पाणी वेगळे होते आणि हेच पाणी शरीराच्या बाहेर पडते.
त्यामुळे झटपट वजन कमी करण्याच्या सुरुवातीच्या प्रवासात जे तुम्हाला एकदम वजन कमी झालेले दिसून तुम्ही खुश होता ते वजन पाणी शरीराबाहेर गेल्यामुळे कमी झालेले असते. आणि असे कमी झालेले वजन वाढते सुद्धा लवकरच.
अशा पद्धतीचे वजन हे तात्पुरते कमी झालेले असते. त्यामुळे जलदगतीने वजन कमी करत असताना जेव्हा अशा पद्धतीने झटपट तुमचे वजन कमी हहोते तेव्हा अतिउत्साह न दाखवता त्यामागचे हे वास्तव लक्षात ठेवा.
२. मसल लॉस
झटपट पद्धतीने वजन करण्याचा अजून एक गंभीर स्वरूपाचा होणारा परिणाम म्हणजे तुमचे स्नायू कमी होणे. जलदगतीने वजन करताना अधिक व्यायाम, कमी जेवणामुळे शरीरात ऊर्जेची कमतरता होते तेव्हा शरीर एक तर चरबी नाहीतर स्नायू मधील कॅलरीज चा उपयोग करायला सुरुवात करते.
अशा वेळी जर पुरेशा प्रमाणात प्रोटीन घेत असाल तर हे नुकसान थोडे कमी होते पण परिस्थिति तीच राहते. त्यामुळे आपण उपाशी राहतो म्हणजे लागणारी ऊर्जा ही आपल्या मसल मधून जात आहे हे लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे.
तुमचे स्नायू कमी आणि कमकुवत होतात तेव्हा तुमच्या मेटबॉलीसम वर देखील त्याचा परिणाम होतो. अशा वेळी मेटबॉलीसम कमी होते. परिणामी व्यायाम थांबवल्यानंतर तुमचे वजन पहिल्यापेक्षा अधिक जास्त आणि लवकर वाढते.
३. होरमोन असंतुलन
जेव्हा तुम्ही झटपट वजन कमी करायला लागता तेव्हा तुमच्या शरीरातील काही हॉर्मोन्स ची सुद्धा परेशानी होत असते. म्हणजे हॉर्मोन्स मध्ये बिघाड होऊन त्यांच्यामध्ये असंतुलन होण्यास सुरवात होत असते.
हे हॉर्मोन्स विशेषकरून तुमच्या भुकेशी आणि पोट भरल्यानंतर तृप्त होण्याशी संबंधित असतात. थोडक्यात हे हॉर्मोन्स तुमची भूक आणि तृप्त अशा भावना नियंत्रित करत असतात. हे आहेत हॉरमोन लेप्टिन (leptin) आणि घ्रेलिन (ghrelin).
लेप्टिन
अगोदर लेप्टिन बद्दल बोलूया. लेप्टिन हे हॉरमोन तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर तुमच्यामध्ये तृप्त झाल्याची भावना निर्माण करते. हे हॉरमोन तुमच्या ऍडिपोसाइट्स नावाच्या (adipocytes) चरबीच्या कोषिका मध्ये तयार होत असते.
जेव्हा तुमच्या शरीरात पुरेशा प्रमाणात ऊर्जा असेल तेव्हा हे लेप्टिन हॉरमोन मेंदू पर्यंत जाऊन, आता आपल्याकडे भरपूर ऊर्जा आहे त्यामुळे जेवण थांबवा अशा प्रकारचे सिग्नल देतो. यामुळे तुम्हाला एक प्रकारची तृप्त भावना किंवा पोट भरल्याची भावना अनुभवायला मिळते आणि तुम्ही तुमचे जेवण थांबवता.
पण समस्या इथे ही आहे की हे लेप्टिन हॉरमोन तुमच्या चरबीच्या कोषिका मध्ये तयार होते. त्यामुळे जेवढी तुमची चरबी चे प्रमाण तेवढे हे लेप्टिन हॉरमोन चे प्रमाण असे म्हणायला काही हरकत नाही.
पण झटपट पद्धतीने वजन कमी करता तेव्हा जलद वेगाने चरबी सुद्धा कमी होते. जलद वेगाने चरबी कमी झाल्यास तुमचे लेप्टिन हॉरमोन सुद्धा कमी होणार. परिणामी तुमच्या मेंदुपर्यंत जेवण थांबवण्याचा आदेश जाणारच नाही ज्यामुळे तुम्ही पोटात अन्न घेतच राहता. याचाच परिणाम असा होतो की तुमचे वजन पहिल्यापेक्षा जास्त वाढते.
याचा एक परिणाम असा ही होतो की तुमची भूक, craving वाढते ज्यामुळे तुम्ही जेवतच राहता आणि परिणामी तुमचे वजन वाढायला लागते.
घ्रेलिन
दुसरे हॉरमोन आहे घ्रेलिन (ghrelin). घ्रेलिन हॉरमोन ला ‘हंगर हॉरमोन‘ सुद्धा म्हटले जाते. कारण हे हॉरमोन तुम्हाला लागणाऱ्या भुकेशी संबंधित आहे.
तुमच्या शरीरात जेव्हा ऊर्जेचे प्रमाण अत्यल्प राहते आणि शरीराला काम करण्यासाठी अजून ऊर्जा आणि कॅलरीज ची गरज पडते तेव्हा हे हॉरमोन मेंदुपर्यंत जाऊन तुमच्यामध्ये भूक लागल्याची भावना उत्पन्न करते.
हेच कारण आहे की तुम्ही जेव्हा झटपट वजन कमी करता तेव्हा अचानक ऊर्जेची कमतरता शरीरात उत्पन्न होते आणि यानंतर हे घ्रेलिन हॉरमोन त्याचे काम करते. ते म्हणजे मेंदूला भूक उत्पन्न करण्याचे सिग्नल देऊन जेवण करण्यास भाग पाडणे.
परिणामी होते असे की तुमची भूक वाढतच जाते आणि तुम्ही जेवण सुद्धा जास्त करायला लगता.
झटपट वजन कमी करत असताना हे सर्व परिणाम आणि तुमच्या शरीरात बदल घडत असतात ज्याची माहिती तुम्ही आत्ताच जाणून घेतली.
झटपट वजन कमी करण्याचे गंभीर परिणाम
तुम्हाला झटपट वजन कमी करायची किती घाई झाली असेल हे मी समजू शकतो. बऱ्याच जणांनी यासाठी पावले सुद्धा उचलले असतील आणि त्यानुसार वजन सुद्धा कमी झाले असेल. पण हा आनंद क्षणिक ठरू नये यासाठी तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे.
शेवटी शरीर आणि त्याचे आरोग्य हीच खरी आणि वास्तव संपत्ति आहे. त्यामुळे या संबंधी कोणताही निर्णय घ्यायचा झाला तर पूर्ण योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या.
म्हणूनच यासाठी मी तुम्हाला झटपट किंवा जलद पद्धतीने वजन कमी करण्याचे कोणते गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.
पौष्टिक कमतरता
सर्वात आधी पौष्टिक कमतरते बद्दल बोलूयात. झटपट वजन कमी करण्यासाठी तुम्ही जेव्हा कमी जेवण करता, उपाशी राहता, अतिरिक्त व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता आढळते. जसे की विटामीन, कार्ब, मिनरल वगैरे घटकांची कमतरता.
यामुळे ज्या पौष्टिक घटकाची कमतरता होते त्या संबंधी आजार होऊ शकतात.
उदाहरणार्थ, जर पुरेसे लोह, व्हिटॅमिन बी 12 आणि फोलेट मिळत नसेल तर त्यामुळे थकवा, अशक्तपणा येऊन अनेमिया आजार होऊ शकतो.
व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता झाली तर हाडे ठीसुळ होणे, कमकुवत होणे आणि हाडांसंबंधी इतर समस्या जाणवू शकतात.
त्यानंतर कमी कॅलरीज आणि पुरेसे पोषक तत्व शरीराला मिळत नसतील तर त्यामुळे तुम्हाला केसगळती आणि तुमची प्रतिकारशक्ति सुद्धा कमी व्हायला लागते.
मानसिक परिणाम
झटपट वजन कमी करण्याच्या बाबतीत एक अवघड गोष्ट राहते ती म्हणजे कमी झालेले वजन टिकवणे. आपण वर बघितले की डायट मध्येच सोडला तर अशा वेळी वजन पहिल्यापेक्षा जास्त वेगाने आणि जास्त प्रमाणात वाढते.
त्यामुळे कमी झालेले वजन टिकवणे खूप आव्हानात्मक होते ज्यामुळे तुमची चिडचिड, थकवा, सतत राग येणे अशा मानसिक समस्या होऊ शकतात. याचसोबत अनेक अभ्यासात हे दिसले की यामुळे नैराश्य, चिंता ही लक्षणे सुद्धा वाढतात.
पित्ताशय खडे
तुमच्या पित्ताशयात खडे होणे हे जलद गतीने वजन कमी करण्याचे सामान्य लक्षण आहे. कारण जेव्हा तुम्ही क्रॅश डायट करता तेव्हा तुमचे लिवर हे बाइल अॅसिड मध्ये जास्त प्रमाणात कॉलेस्ट्रॉल secrete करायला लागते.
या वाढलेल्या कॉलेस्ट्रॉल चे पित्ताशयात खडे तयार होतात. यामुळे तुम्हाला अतिशय भयानक अशा वेदना होऊ शकतात.
एवढे सगळे गंभीर परिणाम तुम्हाला तुमच्या काही क्षणिक आनंदासाठी भोगावे लागू शकतात. कारण खरंच झटपट वजन कमी करणे हे जोखमीचे आहे आणि काही वेळा तुमच्या आरोग्यावर याचा दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो.
तेव्हा जो निर्णय घ्यायचा तो विचारपूर्वक घ्या.
शेवटी थोडा विचार करा.
चला आता थोडा विचार करण्याची वेळ आली आहे. या ब्लॉग मधून तुम्हाला झटपट वजन कमी करण्याविषयी कोणता विचार, माहिती मिळाली याचे विश्लेषण मी करणार नाही. हे तुम्हीच ठरवायचे आहे. पण एक गोष्टीची अपेक्षा इथे मी करतो.
ती म्हणजे या ब्लॉग मधून तुम्हाला झटपण वजन कमी करणे हे आरोग्याच्या दृष्टीने किती योग्य किंवा अयोग्य आहे याचा एक अंदाज तुम्हाला नक्कीच आला असेल.
तुमच्या लक्षात नसेल तर थोडक्यात सांगतो. वजन झपाट्याने कमी केल्यामुळे तुमचे स्नायू, चयापचय, आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतात हे मी अगदी अस्पष्ट केले आहे. या वास्तवाला कदाचित तुम्ही दुर्लक्षित ही करताल कारण तुमच्या मनात ‘वजन तर कमी होते ना’ ही एकच भूमिका असेल.
पण या सर्व माहितीतून तुमच्या आणि कोणत्याही ‘सजग मेंदू’ असणाऱ्या व्यक्तीच्या मनात एक प्रश्न नक्कीच यायला हवा. तो म्हणजे खरंच तुम्ही तुमच्या दीर्घकालीन आणि सर्वांगीण आयुष्याचा धोका पत्कारून हे क्षणिक असलेले ध्येय आणि आनंद मिळवायला तयार आहात का?
माझ्या अनुभवाने तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्यापैकी किती जणांनी झटपट वजन कमी करायचे म्हणून क्रॅश डायट, उपाशी राहणे किंवा इतर गोष्टी केल्या आणि किती जणांना त्याचा रिजल्ट मिळाला ?
बऱ्याच जणांना त्याचा फायदा ही झाला असे, वजन कमी झाले असेल. पण मग त्यानंतर किती जणांचे वजन तेवढेच टिकले, नंतर वजन वाढले नाही, काही साइड इफेक्ट झाले नाही ?
मला माहिते तुमचे उत्तर काय असणार आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करायची गरज नाही. तुम्ही एकटे नक्कीच नाहीत. बरेच जण अशा गोष्टी करून किंवा खोट्या जाहिराती बघून त्यावर काम करणारे बरेच आहेत. आणि मग त्यातून हाती निराशा झेलणारे देखील बरेच.
ब्लॉग च्या शेवटी मी तुम्हाला एक ठोस आणि सकारात्मक विचार देणार आहे. तुम्हाला वजन कमी करायचेच आहे तर टिकाऊ पद्धतीने वजन कमी करा. त्याला सस्टेनेबल वेट लॉस. म्हणजे सुरक्षित आणि टिकणारे वेट लॉस. काही साइड इफेक्ट नको आणि कोणते दीर्घकालीन गंभीर परिणाम नकोत.
सुरक्षित आणि टिकाऊ पद्धतीने वजन कमी करणे हे सर्वात सोपे आणि अवघड काम आहे. सोपे यामुळे की कुणीही करू शकतो आणि अवघड यासाठी की संयम खूप हवा. फक्त तुम्हाला संतुलित आहार, आवडणारा व्यायाम तुमच्या आणि शरीराला चांगल्या सकारात्मक सवयी लावायच्या आहेत.
हे सगळं तुम्ही आजच आणि आत्ता सुरुवात करू शकता. यावर अजून सविस्तर आणि सखोल माहिती तुम्हाला हवी असेल माझे इतर ब्लॉग तुम्हाला मदत करू शकता. त्यांची माहिती खाली देत आहे.
संबंधित वाचा- वजन कमी करण्यासाठी नेमके काय करावे ?
संबंधित वाचा- वजन कमी करण्यासाठी काय खाय खावे लागते ?
संबंधित वाचा- वजन कमी करण्यासाठी उपयुक्त विशिष्ट व्यायाम.
संबंधित वाचा- वजन कमी करण्यासाठी उपयुक्त पडणारे आयुर्वेदिक औषधे.
शेवटी पुन्हा विचारतो की तुम्हाला कसे वजन कमी करायचे आणि कशासाठी वजन कमी करायचे आहे. या दोन प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे द्या आणि मग त्यावर कृती करा.
जर तुम्ही अगोदर झपाट्याने वजन कमी केले आहे किंवा करत असाल आणि काही चांगले वाईट अनुभव असतील तर माझ्याशी नक्की शेअर करा. जसे की वजन पटकन कमी तर झाले पण वाढले देखील लवकर, त्यानंतर तुम्ही झपाट्याने वजन कमी केल्यामुळे इतर साइड इफेक्ट वगैरे या गोष्टी शेअर करू शकता.
माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, ब्लॉग वरील माहिती कशी वाटली हे मला कमेन्ट करून कळवू शकता. धन्यवाद.
लवकरात लवकर वजन कसे कमी करावे?
लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी कॅलरी डेफिसिट आहार, संतुलित आहार, आणि हाय-इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग (HIIT) व्यायामा चा उपयोग करा.
मध आणि लिंबू पोटाची चरबी कमी करू शकतात का?
होय. मध आणि लिंबू पोटाची चरबी कमी करू शकतात. नियमितपणे गरम पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातल्या विषारी घटकांचे उत्सर्जन वेगाने होते, ज्यामुळे पोटातील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.
गरम पाण्यात मध प्यायल्याने वजन कमी होते का?
गरम पाण्यात मध घेतल्यास पचन प्रक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे कॅलरी बर्निंग प्रक्रियेत वाढ होते. पण मग ही होऊन वजन कमी होते असा काही पुरावा नाही.
चालताना मी किती किलो वजन कमी करू शकतो?
वजन कमी करण्यासाठी चालण्याचे फायदे खूप आहेत, पण वजन कमी होण्याचे प्रमाण तुमच्या वजन, चालण्याची गती, आणि दररोज चाललेला वेळ यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, 70 किलो वजन असलेली व्यक्ती 1 तासात 300-400 कॅलरी बर्न करू शकते.
1 किलो वजन कमी करण्यासाठी किती तास चालायचे?
साधारणतः 1 किलो वजन कमी करण्यासाठी 7700 कॅलरी बर्न करणे आवश्यक असते. जर तुम्ही दररोज 1 तास वेगाने चालून 300-400 कॅलरी बर्न करत असाल, तर साधारणतः 19-25 तास चालल्यास 1 किलो वजन कमी करता येईल.
वजन कमी करण्यासाठी किती वेळ चालावे?
दररोज किमान 30-60 मिनिटे चालणे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. तुम्ही 30 मिनिटे चालल्यास 150-200 कॅलरी बर्न होऊ शकतात, आणि ही तुमच्या लॉन्ग टर्म साठी चांगले आहे.
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Certified Nutritionist.
Experienced Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747