तुम्हाला वजन कमी करायचं आहे पण स्ट्रीक्ट डायट आणि तो शरीराला नकोसा वाटणारा व्यायाम नको आहे.
किंवा मग या सर्व गोष्टी साठी तुमच्याकडे वेळ नाहीये ?
अशा परिस्थिति मध्ये वजन कमी करण्याचे घरगुती उपाय तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात.
कारण आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत वजन कमी करणं हे एक मोठं आव्हान होऊ बसलं आहे.जीम मध्ये जाऊन किंवा घरी राहून व्यायाम आणि मोजका, विशिष्ठ आणि महागडा डायट करायला बहुतेक जणांना वेळच मिळत नाही.
अशा वेळेला काही घरगुती उपायच तुमची मदत करू शकतात. कारण अनेक अभ्यासआणि संशोधनात काही घरगुती उपाय हे तुमचं वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे.
पण वजन कमी करण्यासाठी अनेक जण अनेक उपाय सांगतात. पण सर्वच उपाय प्रभावी आणि पाहिजे तो रिजल्ट देणारे नक्कीच नाहीयेत. हे ज्यांनी करून बघितले त्यांना नक्कीच माहीत असणार.
पण मग नेमके कोणते उपाय करावे हा तुमच्या मनात महत्वाचा प्रश्न उभा राहतो.
पण आता काळजी नको. एक आहार तज्ञ म्हणून या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला वजन कमी करण्याचे अचूक, प्रभावी आणि सुरक्षित उपाय सांगणार आहे.
हे उपाय वापरुन तुमचं फक्त वजन कमी होणार नाही तर इतर कोणते ही साइड इफेक्ट न होता तुमचं दैनंदिन आरोग्य सुद्धा सुधारणार आहे.
चला तर मग तयार व्हा वजन कमी करण्यासाठी चे सोपे आणि अत्यंत प्रभावी घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी.
वजन कमी करण्याचे घरगुती उपाय कसं काम करतात ?
तुमचं वजन कमी करणारे घरगुती उपाय जाणून घेण्याच्या अगोदर त्या विषयी मूलभूत माहिती जाणून घेऊया. हे घरगुती उपाय वजन कसं कमी करतात तुम्हाला याची माहिती असणं आवश्यक आहे.
मी जे उपाय सांगणार आहे तेच नाही तर कोणताही घरगुती उपाय वजन कमी करण्यात कसा मदत करतो याची माहिती असेल तर त्या विषयी तुम्ही जास्त जागरूक होऊन त्याचा उपयोग करू शकता.
कारण वजन कमी करण्याची प्रक्रिया काही ठराविक तत्वांवर अवलंबून असते. त्यामुळे हे घरगुती उपाय त्या पैकी कोणत्याही एका किंवा त्यापेक्षा जास्त तत्वांची पूर्तता करायला हवे.
चला तर जाणून घेऊया अशा काही महत्वाच्या गोष्टी ज्या वजन कमी करण्यासाठी कोणत्याही उपायांमध्ये असायला हव्यात.

१. कॅलोरी डेफिसिट निर्माण करणे
कॅलोरी डेफिसिट शिवाय कुणाचे ही कोणत्या ही परिस्थितिमध्ये वजन कमी होणे अशक्य आहे. वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला कॅलोरी डेफिसिट ठेवावेच लागेल.
म्हणूनच कोणतही सीक्रेट किंवा कोणताही उपाय, औषध असू द्या, ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तुमच्या शरीरात कॅलोरी डेफिसिट निर्माण करतोच आणि करायलाच पाहिजे.
बहुतेक घरगुती उपायांमध्ये कमी कॅलरीज असतात. या कमी कॅलरीज मुळे तुमच्या शरीरात कॅलोरी डेफिसिट निर्माण व्हायला मदत होते.
२. मेटाबॉलिझम वाढवणे
तुमचं मेटाबॉलिझम चांगलं असणं हे सुद्धा वजन कमी करण्यासाठी एक आवश्यक निकष आहे. तुमचं मेटाबॉलिझम चांगलं असेल तरच पोषक घटकांचे शोषण आणि शरीरांतर्गत वितरण योग्य आणि आवश्यक प्रमाणात होते.
शिवाय तुमच्या कॅलरीज कुठून येणार, किती बर्न होणार आणि कशा पद्धतीने बर्न होणार हे तुमच्या मेटाबॉलिझम वर अवलंबून असते. तुमचा मेटाबॉलिझम जेवढा चांगला आणि जास्त, तेवढं तुमचं चरबी किंवा कॅलरीज जळण्याचं प्रमाण अधिक.
म्हणून काही घरगुती उपाय मेटाबॉलिझम वाढवण्याचं काम करतात.
३. पाचन सुधारणे
तुमची पाचन क्रिया ठरवते की तुम्ही जे अन्न घेत आहात त्याचा योग्य आणि पुरेपूर फायदा तुम्हाला मिळणार आहे की नाही. तुम्ही सातत्याने पोषक आहार घेतला, व्यायाम केला पण जर तुमची पाचन क्रियाच बिघडलेली असेल तर त्याचा फायदा होत नाही.
अनेक गोष्टी तुमच्या पाचनक्रिये वरच अवलंबून असतात. विषयांतर होईल म्हणून त्या सर्व घटकांची माहिती इथं सांगणं शक्य नाही. शिवाय तुम्ही जो घरगुती उपाय करत असाल त्याचा सरळ सरळ संबंध तुमच्या पचन संस्थेशीच येतो.
म्हणून तुमची पाचनक्रिया चांगली होईल याची खात्री काही घरगुती उपाय करत असतात.
४. भूक नियंत्रित करणे किंवा कमी करणे
तुमची भूक नियंत्रित करणं किंवा ती कमी करणे याचा एकच महत्वाचा उद्देश असतो की तुम्ही कमी जेवले पाहिजे. जेव्हा तुम्ही नियंत्रित पद्धतीने कमी आहार घेता तेव्हा आपोआपच तुमच्या शरीरात कमी कॅलरीज जातात.
परिणामी तुमचं वजन नियंत्रित राहतं किंवा तुम्ही कॅलरी डेफीसीट मध्ये असाल तर वजन कमी होतं.
त्यामुळे काही घरगुती उपाय तुमची भूक कमी किंवा नियंत्रित करून वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला वेग देतात.
५. डिटॉक्स करणे
काही घरगुती उपाय शरीरात डिटॉक्स इफेक्ट निर्माण करतात. डिटॉक्स करणे याला साधारण भाषेत शरीर शुद्धी करणे असं म्हणू शकता. या प्रक्रियेत तुमच्या शरीरातील हानिकारक पदार्थ (toxins) शरीराच्या बाहेर काढण्याचं काम केलं जातं किंवा त्या पदार्थांना neutral केलं जातं.
हानिकारक पदार्थ (toxins) तुमचं मेटबॉलीजम कमी करतात तसंच तुमच्या पाचनक्रियेत सुद्धा नकारात्मक परिणाम करतात. याचा परिणाम तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात अडथळा ठरतो.
याचमुळे वजन कमी करण्याचे घरगुती उपाय तुमचं शरीर डिटॉक्स करायचं सुद्धा काम करतात.
हे सर्व परिणाम तुमच्या शरीरात घडून आल्यावर तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत असते. त्यामुळे मी जे वजन कमी करण्याचे घरगुती उपाय किंवा तुम्ही इतर कोणताही उपाय करत असाल तर ते वरील पैकी कोणत्या गोष्टीची पूर्तता करतात ते जाणून घ्या.
चला तर यानंतर बघूया कोणते आहेत ते घरगुती उपाय.
१. गाजर आणि लेट्यूस चा रस
सर्वात अगोदर तुम्ही गोंधळात पडू नये यासाठी लेट्यूस काय आहे हे सोप्या भाषेत सांगतो. कोबी च्या भाजीला जे पानं असतात त्याला लेट्यूस म्हणतात.
अशा या पानांचा आणि गाजराचा एकत्रित केलेला रस तुमचं वजन कमी करण्यात मदत करतं. साधा, प्रभावी आणि सोपा असणाऱ्या या घरगुती उपाय चे दुसरे सुद्धा अनेक फायदे अनेक फायदे आहेत.
पण वजन कमी होण्याच्या दृष्टीने हा रस कसं तुमचं वजन करू शकतं याची थोडी माहिती जाणून घेऊया.
गाजराचा रस कशामुळे?
तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल की यासाठी फक्त गाजरचाच रस कशासाठी वापरतात.
- फायबर – गाजरा मध्ये भरपूर प्रमाणात असणारे फायबर तुमचं पोट जास्त वेळेसाठी भरलेलं ठेवतात. त्यामुळे तुम्ही अनावश्यक खाण्याची शक्यता कमी होते.
- लो (कमी) कॅलरी – गाजर हा कमी कॅलरी असणारा पदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात घेतले तरी तुमच्या शरीरात जाणाऱ्या कॅलरी ही कमी असतात.
यातून गाजर हे कमी कॅलरी असणारे आणि जास्त वेळ तुमचं पोट भरून ठेवणारे आहे असं कळतं. त्यामुळे अप्रत्यक्षपणे यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते.
लेट्यूस
लेट्यूस हा प्रकार पचायला हलका, रसाळ आणि कमी कॅलरी असणारा आहे.
- यात कमी कॅलरी असल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता कमी होते आणि अनावश्यक कॅलरी जमा होण्याचं प्रमाण कमी राहतं.
- लेट्यूसमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं आणि मेटाबॉलीजम वाढायला मदत होते.
- शिवाय लेट्यूसमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स सुद्धा तुमचं मेटाबॉलीजम वाढवतात आणि शरीरातील हानिकारक पदार्थ (toxins) बाहेर टाकतात.
गाजर आणि लेट्यूसच एकत्र का?
गाजर आणि लेट्यूसचाच रस एकत्र का घ्यावा असं ही कदाचित तुम्हाला वाटत असेल. याचं कारण असं आहे की या दोन्ही चे मिश्रण वजन कमी करण्यासाठी लागणारे महत्वाचे निकष पूर्ण करतात.
अजून एक महत्वाचे कारण की जेव्हा हे दोन पदार्थ एकत्रित केले जातात तेव्हा त्या मध्ये असणाऱ्या गुणांची वाढ होते.
या दोन्ही चे रस कमी कॅलरी, जास्त फायबर, आणि जास्त अँटीऑक्सिडंट्स वजन कमी करण्यासाठी आवश्यक गुणांचं एक उत्तम मिश्रण आहे.
हा रस कसा पिणार?
वेळ: सकाळी उपाशीपोटी हा ज्यूस पिणं जास्त फायदेशीर ठरेल.
मात्रा: 1 ग्लास (200-250ml) पुरेसा आहे.
लक्षात ठेवा : ज्यूसमध्ये साखर घालू नका. त्याऐवजी तुम्हाला थोडा गोडसरपणा हवा असेल, तर गाजराचं प्रमाण वाढवा.
२. पाणी
अनेकजण विचारतात की नुसतं पाणी पिऊन वजन कमी होतं का ?
तुम्हाला सुद्धा आता हाच प्रश्न पडला असणार आहे. पण आज मी तुम्हाला पटवून देणार आहे की पानी पिऊन तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता.
यासाठी आपल्याला यावर झालेल्या काही संशोधानांचा आधार घ्यावा लागणार आहे. पण एकदम सर्व काही गुंतगुंतीचं आणि किचकट होऊ नये यासाठी मी तुम्हाला सर्व काही मुद्देसूद पणाने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
पाण्यामुळे ‘चुकीची भूक’ कमी होती
आपण बहुतेक वेळा भूक आणि तहान या मध्ये गफलत करतो. बऱ्याच वेळा, आपल्या शरीराला पाण्याची गरज असते, तेव्हा आपल्याला भूक लागल्याची जाणीव होते जी चुकीची असते.
ही वस्तुस्थिती आहे.
जेव्हा असं होतं तेव्हा आपण भूक लागली असं समजून अनावश्यकपणे स्नॅक्स किंवा इतर पदार्थ खातो, ज्यामुळे कॅलरीज वाढतात, परिणामी वजन वाढतं.
या परिस्थितीत तुम्हाला जी भूक लागलेली जाणवत असते ती खोटी भूक असते. म्हणून या शीर्षकात जो भूक शब्द वापरला आहे तो या भुकेशी संबंधित आहे हे समजून घ्या.
असं का होत असेल ?
असं होण्याला तीन -चार कारणे मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक समजून घ्या.
- तुमची भूक आणि तहाण या दोन्ही संवेदनांची केंद्रे (centers) तुमच्या मेंदूच्या हायपोथालेमस (Hypothalamus) या भागात अगदी जवळ आहेत. त्यामुळे हे दोन्ही संदेश मेंदूपर्यंत जवळजवळ एकाच ठिकाणाहून पोहोचतात, त्यामुळे मेंदू कधीकधी गोंधळतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा तुम्हाला भूक लागल्यासारखे वाटू शकते.
- तुमच्या शरीरात जेव्हा पाण्याची कमतरता (dehydration) होते तेव्हा साहजिक हायपोथालेमस तुमच्या शरीरात तहान लागल्याची संवेदना निर्माण करतो. पण अशा वेळी तो भूक लागल्याची संवेदना सुद्धा निर्माण करू शकतो. याचे कारण हे की तुम्हाला अन्नातून सुद्धा काही प्रमाणात पाणी मिळत असतं.
- भूक आणि तहान नियंत्रित करण्यासाठी शरीरात घ्रेलिन (Ghrelin) आणि लेप्टिन (Leptin) या हॉर्मोन्सची भूमिका असते. पाण्याच्या कमतरतेमुळे या हॉर्मोन्सच्या स्तरांमध्ये बदल होऊ शकतो, ज्यामुळे भूकेची चुकीची संवेदना निर्माण होऊ शकते.

या कारणांमुळे तुम्हाला तहान लागलेली असताना भूक लागल्याचे जाणवू शकते. अशा वेळी तेव्हा लगेच काहीतरी स्नॅक्स वगैरे तत्सम पदार्थ खाण्याऐवजी, एक दोन ग्लास पाणी प्या. पाणी प्यायल्याने जर तुमची ‘भूक’ कमी झाली, तर याचा अर्थ तुम्हाला भूक नाही तहान लागली होती असं समजा.
तुम्ही जर नीट विचारपूर्वक लक्ष दिलं तर तुम्हाला समजून येईल की तुम्ही असं केल्याने तुम्ही जाणीवपूर्वक स्नॅक्स च्या कॅलरी कमी केल्या आहेत.
पाण्यामुळे तुमची ‘खरी भूक’ कमी होते
पाणी तुम्हाला लागलेली खरी भूक सुद्धा कमी करते. आठवा तुम्ही लहान असताना खेळून आल्यावर जोराची भूक आणि तहान लागत असायची. अशावेळी तुम्ही अगोदर पाणी पित होतात तेव्हा तुमची आई संगत असे की पाणी कमी पी, जेवण जाणार नाही. हे अगदी तसंच आहे.
2014 मध्ये एक अभ्यास करण्यात आला होता. अभ्यासाचा उद्देश असा होता की वजन कमी करण्यासाठी जेवणाआधी पाणी पिण्याचा प्रभाव समजून घेणे. या अभ्यासात विशेषतः लठ्ठपणाची समस्या असलेल्या ५० महिलांवर पाणी पिण्याचे परिणाम तपासण्यात आले.
हा प्रयोग एकूण 8 आठवडे चालवला गेला. अभ्यासादरम्यान महिलांना दररोज प्रत्येक जेवणाच्या (नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण) 30 मिनिटे आधी 500 मि.ली. पाणी पिण्यास सांगितले गेले.
8 आठवड्यांनंतर महिलांच्या शारीरिक बदलांचे निरीक्षण करण्यात आले. या निरक्षणानुसार महिलांच्या शरीरात तीन महत्वाचे बदल दिसून आले.
- पाणी पिल्यामुळे महिलांचे एकूण वजन लक्षणीय प्रमाणात कमी झाले.
- चरबीचे प्रमाण (फॅट पर्सेंटेज) कमी झाले, ज्यामुळे शरीर अधिक तंदुरुस्त दिसू लागले.
- बॉडी मास इंडेक्स, जो लठ्ठपणाचे प्रमाण दर्शवतो, तोही कमी झाला.
तुमचं पोट आणि मेंदू यांच्यात सतत संवाद चालू असतो. केमिकल संवाद. याला गट-ब्रेन अक्सिस म्हणतात.
तूमच्या पोटातील सिग्नल ग्रहण करणारे रिसेप्टर्स (stretch receptors) जेव्हा सक्रिय होतात तेव्हा ते मेंदूला “आता खाणे थांबवा” असा सिग्नल पाठवतात.
एनर्जि एक्स्पेंडीचर मध्ये वाढ
तुमच्या शरीराचा एनर्जि एक्स्पेंडीचर जास्त असेल तर तुमच्या कॅलरीज सुद्धा जास्त बर्न होतात. जेवढ्या जास्त कॅलरीज बर्न होतील तेवढा जास्त फायदा तुमच्या वजन करण्याच्या प्रक्रियेला होत असतो.
या संदर्भात आपण २०१४ साली झालेल्या एका अभ्यासाचा आधार घेऊया. २०१४ साली तुमच्या शरीरावर थंड, सामान्य आणि शरीर तापमानाचे पाणी पिल्यावर काय परिणाम होतो याचा एक अभ्यास करण्यात आला होता.
यामध्ये एकूण १२ लोकांना अभ्यासण्यात आले होते. पाणी पिल्यानंतर 90 मिनिटांसाठी त्यांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण करण्यात आले.
यासाठी तीन प्रकारचे पाणी वापरण्यात आले होते.
- थंड पाणी (cold water).
- सामान्य तापमानाचे पाणी (room-temperature water).
- शरीराच्या तापमानाएवढे गरम पाणी (body-tempered water).
90 मिनिटांनंतर शरीरात जे बदल झाले ते वजन कमी करण्याच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक होते. तीन प्रकारचे पाणी वापरल्यानंतर शरीरात तीन वेगळे परिणाम बघायला मिळाले.
- थंड पाणी पिल्यानंतर 90 मिनिटांत त्यांच्या उर्जे च्या वापरात 2.9% वाढ झाली.
- सामान्य तापमानाचे पाणी पिल्यानंतर ऊर्जा वापरात 2.3% वाढ झाली.
- शरीराच्या तापमानाएवढे गरम पाणी बाबतीत असा कोणताही परिणाम शरीरात आढळले नाही.
यातून थोडक्यात निष्कर्ष असा निघतो की शरीर थंड पाण्याला शरीराच्या तापमाना एवढे गरम करण्यासाठी जी मेहनत किंवा ऊर्जा खर्ची करतो, त्यामध्ये तुमच्या अतिरिक्त कॅलरीज बर्न केल्या जातात.
त्यामुळे थंड पाणी तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी दिवसातून काहीवेळा थंड किंवा सामान्य तापमानाचे पाणी पिण्याची सवय लावा.
थोडक्यात काय तर पाणी वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय आहे. मेटाबॉलिजम सुधारणे, भूक कमी करणे, आणि अतिरिक्त कॅलरी बर्न करणे हे घटक तुमचं वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जे पूर्ण करायला पाणी तुमची मदत करणार आहे.
३. लिंबू पाणी
बरेच जण वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून लिंबू पाणी चा उपयोग करत असतील. हा उपाय एकदम प्रचलित आहे. काहींना याचा उपयोग होतो तर काहींना नाही.
ज्यांना याचे परिणाम दिसले नाही त्यासाठी एक कारण असू शकतं. ते म्हणजे लिंबू पाणी बद्दल अवास्तव अपेक्षा.
हे बघा, लिंबू पाणी तुमचं वजन कमी करण्याला नक्कीच मदत करतं. पण ते अगदी झटपट, प्रभावी आणि लक्षणीय पद्धतीने होत नाही. थोडक्यात काय तर लिंबू पाणी हा वजन कमी करण्यासाठी जादू करणारा उपाय नाहीये. पण वजन कमी करण्यासाठी त्याची मदत नक्कीच होऊ शकते.
त्यामुळे काहीच नाही दररोज आणि दिवसभर फक्त लिंबू पाणीच प्या आणि वजन कमी करा असा विचार चुकीचा आहे. असा विचार कराल तर ही तुमची अवास्तव अपेक्षा असेल ज्यामुळे शेवटी तुमची निराशा होईल.
लिंबू पाणी कशा पद्धतीने वजन कमी करतं हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही हा उपाय वापरुन निराश होणार नाही, हे नक्की.
तर मग कशा पद्धतीने लिंबू पाणी तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतं ते बघूया.
हायड्रेशन
सर्वात अगोदर लक्षात घ्या की लिंबू म्हणजे काय. पाणी ज्यात थोडा लिंबू चा रस मसळलेला असतो. थोडक्यात, थोडा लिंबू चा रस वजा पाणी. त्यामुळे लिंबू पाणी हे ही अधिक प्रमाणात पाणीच आहे. त्यात फक्त लिंबू चा रस मिक्स आहे म्हणू त्याला आपण लिंबू पाणी म्हणतो.
यामुळेच वर आपण जे वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याचे फायदे मिळतात ते लिंबू पाणी घेतल्यामुळे सुद्धा मिळतात.
पण याबाबतीत अजून एक महत्वाचा मुद्दा समाविष्ट करतो, हायड्रेशन चा.
हायड्रेशन म्हणजे तुमच्या शरीरात पुरेसा पाण्याचा समतोल ठेवणे. तुमच्या शरीरात नेहमी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असायला हवे. वजन कमी करण्याच्या दृष्टीने तुमचं शरीर हायड्रेट असणं खूप महत्वाचं आहे. आणि हायड्रेशन तुम्हाला पाणी किंवा लिंबू पाणी घेतल्यामुळे ठेवता येते.
वजन कमी करण्यासाठी हायड्रेशनचे महत्त्व समजून घेणं खूप गरजेचं आहे.
आता हायड्रेशन वजन कमी करण्यात कशी मदत करतो हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊया.
मेटाबॉलिझम सुधारतो
जेव्हा तुमचं शरीर हायड्रेटेड असतं, तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) सुद्धा चांगलं राहतं. कारण पाणी तुमच्या शरीरातील प्रत्येक प्रक्रियेत सहभागी असते. अगदी तुमच्या शरीरातील पेशींमध्ये ऑक्सिजन पोचवण्यापसून ते तुमच्या शरीरात कॅलरीज चा उपयोग करण्यापर्यंत.
या सर्व प्रक्रिया पाण्या च्या उपस्थिती मध्ये जलद आणि प्रभावी पणाने होतात, ज्यामुळे तुमच्या कॅलरीज सुद्धा अधिक प्रमाणात बर्न होतात.
डिटॉक्सिफिकेशन होते
पाणी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकत असते. हे काम किडनी मार्फत होत असतं. पण या सर्व विषारी द्रव्यांना किडनी पर्यंत आणि किडनी च्या बाहेर नेण्याचे काम पाणी च करत असते.
विषारी द्रव्ये किंवा अन्य अपायकारक घटक बाहेर टाकले की तुमच्या नैसर्गिक पाचन आणि मेटाबॉलिझम ला काहीही अडचण येत नाही. या दोन्ही गोष्टी एकदम सुरळीत आणि प्रभावी पणे चालू राहतात.
पुढे नैसर्गिक पाचन आणि मेटाबॉलिझम हे वजन कमी करण्याला मदत करतात.
कार्यक्षमता वाढवणे
वजन कमी करण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा असतो. पण हा व्यायाम करत असताना तुम्हाला जो घाम येतो त्यातून बरंच पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स (electrolytes) बाहेर पडत असतात. यामुळे तुम्हाला थकवा येतो ज्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात व्यायाम करू शकत नाही.
पण तुमच्या शरीरात जर आवश्यक प्रमाणात पाणी असेल तर वरची परिस्थिति उद्भवणार नाही. परिणामी तुम्ही जास्त वेळ व्यायाम करू शकाल.
थकवा कमी होतो
डिहायड्रेशनमुळे थकवा येतो, ज्यामुळे तुमच्या दैनंदिन हालचाली कमी होऊ शकतात. शारीरिक हालचाली कमी म्हणजे कॅलरीज चा उपयोग ही कमीच. यामुळे तुमचं वजन तर कमी होणारच नाही, ते वाढेल.
त्यामुळे पाणी पित रहा. यामुळे तुमची उर्जा टिकून राहील, सक्रियता वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला वजन कमी करणं सोपं जाईल.
स्नायू मजबूत ठेवणे
तुमचे स्नायू जर मजबूत आणि चांगल्या आकारात असतील तर तुमचं मेटाबॉलिझम चांगलं राहतं. स्नायू मजबूत असतील तर तुमचा मेटाबॉलिक रेट सुद्धा वाढतो. पण त्यासाठी तुम्हाला चांगले स्नायू बनवण्याकडे लक्ष द्यावे लागेल.
स्ट्रेन्थ ट्रेनिंग करून तुम्ही स्नायू तर बनवू शकता पण त्यासाठी तुमच्या शरीरात पाणी असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे.
स्नायू बनवण्यामद्धे पाणी महत्वाची भूमिका बजावत असतं. शरीरात योग्य प्रमाणात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स नसेल तर स्नायूंची ताकद आणि नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो.
कॅलरी वाढण्याची शक्यता कमी होते
बरेच लोक काहीतरी चविष्ट पेय म्हणून ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर शुगर ड्रिंक्स पित असतात. हे पेय कॅलरीज ने भरपपुर असतात. अशा प्रकारच्या पेयांमध्ये साखर आणि कॅलरीचे प्रमाण खूप जास्त असते.
त्याच जागी जर तुम्ही लिंबू पाणी पिलात तर तुमची काही पिण्याची इच्छा पण पूर्ण होते आणि कॅलरीज सुद्धा वाढत नाही. त्यामुळे दररोज अशा पेयांऐवजी एक ग्लास लिंबूपाणी पिण्यास प्राधान्य द्या.
फक्त एका साखरयुक्त ड्रिंक्स च्या जागी लिंबूपाणी घेतलं तर १००–२०० कॅलरींची बचत होऊ शकते.
उदाहरणार्थ, एक छोट्या सॉफ्ट ड्रिंकच्या बाटलीत १८२ ते २०० कॅलरी असतात. तसंच त्यात साखर आणि इतर कृत्रिम घटक असतात ते वेगळंच. ही सॉफ्ट ड्रिंक जर तुम्ही दररोज आठवडाभर घेतली तर जवळपास १२७४ कॅलरीज जमा होतात.
पण त्याच जागी जर तुम्ही एक ग्लास संत्री किंवा लिंबू रस घेतलं तर तुम्हाला फक्त ११० कॅलरी मिळणार आहेत. म्हणजे आठवडभार दररोज घेतलं तर फक्त ७७० कॅलरी जमा होतात.
अशा प्रकारे तुम्ही दररोज १००–२०० कॅलरींची बचत करू शकता.
४. दालचिनी
तुम्ही जी दररोज स्वयंपाक घरात वापरता ती दालचीनी सुद्धा तुमचं वजन कमी करू शकते यावर तुम्हाला विश्वास नाही बसणार. पण हे खरं आहे.
बरेच जण हा उपाय करत ही असतील.
पण खरंच दालचिनी खाल्ल्याने वजन कमी होते का ?
या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. म्हणून त्याबद्दल चा ऊहापोह करणं गरजेचं आहे.
खरंच दालचीनी तुमचं वजन कमी करू शकते का?
दालचीनी आणि तिचा वजन कमी करण्यावर होणाऱ्या परिणामांवर अनेक अभ्यास करण्यात आले आहेत. त्यापैकी बहुतेक अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की दालचीनी चा उपयोग तुमचं वजन कमी करण्यासाठी होऊ शकतो.
त्यापैकी काही महत्वाच्या अभ्यासाचे विश्लेषण आपण इथे करुयात.
वजन कमी करण्यासाठी दालचिनीच्या परिणामावर आधारित २०२२ मध्ये एक व्यापक अभ्यास प्रकाशित झालेला आहे. परिणाम मोजण्यासाठी शरीराचे वजन, BMI (बॉडी मास इंडेक्स), आणि कंबरेचा घेर या घटकांचा उपयोग करण्यात आला.
या अभ्यासानुसार, दररोज 3 ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात दालचिनीचे सेवन केल्यावर वजन आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) कमी होण्यासाठी लक्षणीय मदत झाल्याचे आढळून आले.
प्रकर्षाने दूसरा निष्कर्ष या अभ्यासाचा असा आहे की पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) असलेल्या रुग्णांमध्ये दालचिनीचा प्रभाव अधिक परिणामकारक ठरतो.
म्हणून पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) असलेल्या महिलांसाठी सुद्धा दालचीनी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
लिपिड्सची कार्य
तुमचं वजन वाढवण्या किंवा कमी करण्यामध्ये लिपिड्स मॉलिक्यूल खूप महत्वाचे घटक ठरतात. हे लिपिड्स म्हणजे तुम्ही थोडक्यात त्याला चरबीच्या कोशिका म्हणू शकता.
याबाबतीत तुम्हाला दोन महत्वाच्या प्रक्रिया लक्षात ठेवायच्या आहेत.
- लिपोजेनेसिस (Lipogenesis): या प्रक्रियेत तुमचं शरीर कार्बोहायड्रेट्स (carbohydrates) आणि प्रथिने (protein) यांपासून चरबी तयार करत असते.
- लिपोलिसिस (Lipolysis): यामध्ये तुमचं शरीर वरच्या प्रक्रियेतून साठवलेल्या चरबीचे विभाजन (तोडून) करून चरबी चे प्रमाण कमी करते.
त्यामुळे वजन किंवा चरबी कमी करण्यासाठी लिपोलिसिस वाढणे आणि लिपोजेनेसिस कमी होणं अत्यंत गरजेचं आहे.
याबाबतीत आपल्याला एक झालेला अभ्यास महत्वाचा आधार देतो. २०२३ साली नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता.
या अभ्यासात असं दिसून आलं की दालचिनी ही लिपोजेनेसिस कमी करते आणि लिपोलिसिस वाढवते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
याशिवाय, वीएलडीएल-सी (VLDL- चांगले कॉलेस्ट्रॉल) मध्ये घट आणि एचडीएल-सी (HDL- वाईट कॉलेस्ट्रॉल) मध्ये वाढ होत असल्याचे सुद्धा दिसून आले. यामुळे पुढचा परिणाम असा होतो की चरबी साचून राहणं कमी होतं आणि हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका सुद्धा कमी होतो.
अभ्यासातील हे मुख्य मुद्दे खूप महत्वाचे आहे. यावरून दालचीनी चा वजन कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला काही प्रभावी परिणामांची जाणीव होते.
वजन कमी करण्यासाठी दालचिनीच्या उपयोगाबद्दल इतर वैज्ञानिक संशोधनाने इतर ही काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. तरीसुद्धा या विषयावर अजून सखोल आणि विस्तृत संशोधन होण्याची गरज आहे.
वजन कमी करण्यासाठी दालचिनी कशी घ्यावी?
वजन कमी करण्यासाठी दालचिनी चा उपयोग होतो हे तर आपण स्पष्ट जाणून घेतलं आहे. पण मग दालचीनी कशी घ्यावी ते सुद्धा माहिती पाहिजे.
यासाठी तुम्ही दालचीनी चा पाऊडर च्या स्वरूपात उपयोग करू शकता. म्हणजे दालचीनी चे पाऊडर. पण ते ही कसं आणि किती प्रमाणात घ्यावं ही माहिती असणं गरजेचं आहे.
कारण विशिष्ट पद्धती आणि प्रमाणातच याचा फायदा तुम्हाला दिसणार आहे. म्हणून याची योग्य माहिती असणं आवश्यक आहे.
वजन कमी करण्यासाठी दालचिनी पावडर कशी घ्यावी?

- दालचीनी चहा: 1 चमचा (3 ग्रॅम) दालचिनी पावडर 200 मि.ली. उकळत्या पाण्यात मिसळा. 5-10 मिनिटे उकळा, नंतर गाळून दिवसातून एकदा घ्या. हा चहा सकाळी उपाशी पोटी घेतल्यास फायदेशीर ठरतो.
- दालचिनी आणि मध: 1/2 चमचा दालचिनी पावडर 1 चमचा मधासोबत कोमट पाण्यात मिसळा. हे मिश्रण झोपण्याच्या अगोदर घेतला तर अधिक जास्त फायदा होतो.
- आहारात समावेश करा: दालचीनी चा उपयोग शक्य तेवढा जास्त प्रमाणात तुमच्या रोज च्या आहारात करा.
- सप्लिमेंट्स: दालचिनी सप्लिमेंट्स सुद्धा (कॅप्सूल स्वरूपात) बाजारात उपलब्ध असतात. या स्वरूपात सुद्धा तुम्ही दालचीनी घेऊ शकता. पण बाबतीत तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला आवश्यक राहील.
किती प्रमाणात घ्यावी ?
वजन कमी करण्यासाठी दालचिनीचे योग्य प्रमाणात सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण फायदेशीर परिणाम हे प्रमाणावर अवलंबून असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
संशोधनानुसार, दररोज 3 ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात दालचिनी घेतल्यास वजन आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) यावर लक्षणीय प्रभाव दिसून येतो. यामुळे दालचिनीचे योग्य प्रमाणात सेवन अधिक परिणामकारक ठरतात.
त्यामुळे खालचे मुद्दे लक्षात ठेवा:
- दालचिनीचे सेवन सहसा 3 ग्रॅम प्रति दिवस (सुमारे 1 चमचा) सुरक्षित आणि प्रभावी आहे.
- हे प्रमाण वजन कमी करण्यासाठी पुरेसं आहे आणि या प्रमाणात यकृतावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
- जर तुम्ही पहिल्यांदाच दालचिनी घेत असाल, तर 1/2 चमच्याने (1.5 ग्रॅम) सुरुवात करा आणि नंतर हळूहळू प्रमाण वाढवा.
- बाजारात जी दालचिनी कॅप्सूल असते त्यात 500 मि.ग्रॅ. ते 1000 मि.ग्रॅ. पर्यंत दालचिनी असते. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचे सेवन करा.
- दालचिनीमध्ये कूमारिन (Coumarin) नावाचा घटक असतो, जो अती प्रमाणात घेतला तर यकृताच्या कार्यावर परिणाम करू शकतो. म्हणूनच, दिवसातून 3 ग्रॅमपेक्षा जास्त दालचिनी घेऊ नका.
वजन कमी करण्यासाठी दिवसाच्या कोणत्या वेळी दालचिनी घ्यावी?
वजन कमी करण्यासाठी दालचिनी घेताना योग्य वेळी सेवन करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या वेळा आणि पद्धती याचा विचार करा:
- चहा किंवा कोमट पाण्यात दालचिनी पावडर मिसळून सकाळी उपाशी पोटी घेतली तर त्याने मेटाबोलिझम चांगला होईल.
- जेवणाच्या 30 मिनिटे आधी दालचिनी पाणी किंवा दालचिनी-मध मिश्रण घेतलं तर तुमची भूक कमी होईल.
- रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात दालचिनी पावडर टाकून घेतल्यास रात्रीच्या वेळेत मेटाबोलिझम सुधारेल.
थोडक्यात काय तर दालचिनीच्या सेवनाची वेळ तुमच्या दिनचर्येनुसार तुम्ही ठरवू शकता. पण ती ठरवलेली नियमित असू द्या.
५. चालणे
वजन कमी करण्यासाठी चालणे हा कसा घरगुती उपाय असू शकतो असं तुम्हाला वाटत असेल न ?
किंवा खरंच चालण्याने पोटाची चरबी कमी होते का ?
का नसू शकतो. जी गोष्ट सोपी, घरी करता येऊ शकणारी आणि तेवढीच प्रभावी असेल तर त्याला घरगुती उपाय म्हणून का नाही वापरू शकत.
तसं चालणे या क्रियेला आपण बरंच कमी लेखतो.
पण तुमच्यापैकी बहुतेक जणांना चालणे ही क्रिया वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर आणि प्रभावी आहे याची कल्पना नसणार आहे.
खरं सांगायचं तर वजन कमी करण्यासाठी चालण्यासारखा दूसरा कोणताही प्रभावी आणि सोपा व्यायाम नाहीये (माझ्या मते तरी). याबद्दल आपण पुढे अनेक गोष्टींचा उलगडा कारणार आहोत. त्यामुळे जास्त माहिती करून घेण्यासाठी पुढे वाचत रहा.
खरंच, चालण्याने पोटाची चरबी कमी होते का?
फक्त चालून पोटाची चरबी कमी होते का किंवा वजन कमी होते का याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या सारख्या अनेक जणांना संशय आहे याची कल्पना मला आहे. आणि याचसाठी या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला पुढे याबद्दलचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे.
पहिली गोष्ट म्हणजे याबद्दलचे अनेक संशोधन असच सांगतात की नियमित चालणे ही तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला चालना देतात. या सर्व संशोधानांबद्दल आपण पुढे सविस्तर बोलणारच आहोत.
दुसरी गोष्ट अशी की चालण्याने वजन कमी होते याबद्दल जरी तुमच्या मनात संशय असला तरी याचे इतर अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात हे तुम्ही नाकारू शकत नाही.
त्यामुळेच इथे विन विन परिस्थिति आहे. चालण्याने नुकसान तर होणार नाही हे नक्कीच. पण मला महितेय की तुमची प्राथमिकता चालून वजन कमी करण्यामध्ये आहे. त्यामुळे हाच मुद्दा आपण पुढे नेणार आहोत.
त्यासाठी आपल्याला काही संशोधानांचा आधार घ्यावा लागणार आहे.
नुकताच नाही पण २००२ साली झालेल्या या संशोधनात अस आढळलं की दररोज चालण्याने पोटाच्या विसरल फॅटमध्ये लक्षणीय घट झाली.
संशोधनात ज्या ३१ लठ्ठ पुरुषांनी भाग घेतला होता त्यांनी दररोज एक तास चालण्याचा सराव केला. संशोधनाच्या शेवटी त्यांच्या विसरल फॅटचे प्रमाण कमी आणि इन्सुलिन रेसिस्टन्स सुधारल्याचे दिसून आले.
विसरल फॅट म्हणजे तुमच्या महत्वाच्या अवयवांच्या भोवती जमा होणारी चरबी. ही चरबी तुमच्या अवायवाचे संबंधित कार्यक्षमते मध्ये बिघाड करते ज्यामुळे तुम्हाला अनेक आजार होतात. विसरल फॅट हा तुमच्या लठ्ठपणा वाढवण्यामध्ये सुद्धा खूप महत्वाचा जबादार घटक आहे.
‘द इफेक्ट ऑफ डेलि वॉकिंग ऑन फट डिस्ट्रिब्यूशन’ शीर्षकाखाली एक अभ्यास करण्यात आला होता ज्यात ३१ ते ७२ वयोगटातील ७७ जपानी महिलांचा सहभाग होता. या महिला रोज किती पावले चालल्यावर त्यांचं फॅट डिस्ट्रिब्यूशन कसं होतं यावर अभ्यास करण्यात आला.
या महिलांना त्या दररोज किती पावले चालतात यानुसार वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आले. त्यानुसार संशोधनात दोन महत्वाचे निष्कर्ष आढळले.
- ज्या महिला दररोज ७५०० पेक्षा कमी पावलं चालल्या त्यांच्यामध्ये पोटाच्या आतल्या बाजूला (ज्याला इन्ट्रा-अॅब्डोमिनल फॅट म्हणतात) चरबी जास्त प्रमाणात जमा झाल्याचे आढळले.
- दुसऱ्या गटातील महिला ज्या किमान ७५०० पावलं किंवा त्यापेक्षा जास्त चालल्या, त्यांच्यामध्ये हे इन्ट्रा-अॅब्डोमिनल फॅट जमा होण्याची शक्यता कमी राहत असल्याचे आढळले.
हे संशोधन तुमच्या चालण्याचा तुमच्या पोटाभोवतीच्या चरबीवर होणाऱ्या परिणामांवर केंद्रित होतं. त्यामुळे जे लोक पोटा भोवतीच्या चरबी मुळे परेशान आहेत त्यांच्यासाठी हा अभ्यास महत्वाचा संदर्भ ठरतो.
या अभ्यासातून अजून एक गोष्ट स्पष्ट होते. चालण्याने फक्त तुमची चरबी कमी व्हायला मदत होत नाही तर त्या चरबीचे तुमच्या शरीरात योग्य पद्धतीने वितरण सुद्धा होण्यास मदत होते.
सबक्युटेनियस (पोटा खालची चरबी) आणि विसरल फॅट संबंधी २०१४ मध्ये फिजिकल अॅक्टिविटी अँड न्यूट्रिशन जर्नल मध्ये एक संशोधन प्रकाशित करण्यात आला.
संशोधनात २० महिलांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले. पहिल्या गटातील महिलांनी कोणत्याही प्रकारचा व्यायाम, शारीरिक हालचाल न करता त्यांची रोज ची जीवनशैली करत राहिले. दुसऱ्या गटातील महिला दर आठवड्याला प्रत्येकी ३ दिवस दररोज ५० ते ७० मिनिटे चालल्या.
संशोधनात जे बदल आढळले ते कोणतेच बदल पहिल्या गटातील महिलांमध्ये आढळले नाही. त्या उलट दुसऱ्या गटातील महिला ज्या आठवड्यातून प्रत्येकी ३ दिवस दररोज ५० ते ७० मिनिटे चालल्या, त्यांच्यामध्ये काही महत्वाचे शारीरिक बदल आढळले.
दुसऱ्या गटातील महिलांमध्ये :
- पोटाखालील सबक्युटेनिअस चरबी (subcutaneous fat) आणि व्हिसरल चरबी (visceral fat) दोन्ही कमी झाल्याचे आढळले.
- उपाशी पोटीची ग्लुकोस पातळी (fasting glucose) कमी झाली.
- HOMA-IR, जो की इन्सुलिन प्रतिकार मोजण्यासाठीचा एक निर्देशांक आहे तो कमी झाला.
- TNF-α आणि IL-6 हे साइटोकाईन्स कमी झाले, जे तुमच्या शरीरात कमी इंफ्लॅमेशन असल्याचं दर्शवतात.
- अॅडिपोनेक्टिन (Adiponectin) वाढल्याचे आढळले, ज्यामुळे तुमचं मेटबॉलीजम चांगलं आहे असं समजतं.
वरील पैकी पहिला मुद्दा तुम्हाला आवडला असेल पण इतर चार विषयी तुम्हाला फारसा काही इंट्रेस्ट नसेल. त्याची आवश्यकता पण नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की उर्वरित चार घटक हे एक तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी आवश्यक आहेत किंवा मग कमी कमी वजन असल्याचे परिणाम आहेत.
चालण्याने तुमचं वजन कमी व्हायला मदत होते हे तर खरं आहे. पण याबद्दल तुम्ही अवास्तव अपेक्षा ठेवणं योग्य होणार नाही. तुम्ही फक्त चालून एकदम सिक्स पॅक अॅब्स नाही मिळवू शकत हे सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे.
आणि म्हणूनच चालणे आणि वजन कमी करणे याबद्दल इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं महत्वाचा आहे जसं की चालून किती वजन कमी होऊ शकते , किती चालावे आणि कसे चालावे.
चालल्यावर किती वजन कमी होते?
जर तुम्हाला चालून वजन कमी करायचे असेल तर तुमची कदाचित याबाबतीत निराशा होऊ शकते. कारण हे तेवढं पण सोपं नाही. खरं सांगायचं तर याचं अर्ध उत्तर मी वरच्या भागातच द्यायला पाहिजे होते. पण असो.
चालल्यावर किती वजन कमी होतं हे बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे. जसं की, तुम्ही कितीही चाला पण तुम्ही जर कॅलरी डेफीजीट वर नसाल तर तुमचं काहीच वजन कमी होणार नाही.
त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तेव्हाच उपयोगी ठरणार आहे जर का तुम्ही कॅलरी डेफीजीट वर असाल. त्याच मुळे तुम्ही कॅलरी डेफीजीट वर आहात हे गृहीत धरूनच मी याचं उत्तर देणार आहे.
चालून तुमचं किती वजन कमी होऊ शकतं हे तुमचं सध्याचं वजन, चालण्याचा वेग आणि किती वेळेसाठी चालता यावर अवलंबून आहे. तुम्हाला कळावं यासाठी एक उदाहरण बघूया.
समजा तुमचं वजन ७० किलो आहे आणि तुम्ही ताशी ४ किमी वेगाने एक तासासाठी चाललात तर तुमच्या साधारण २०० ते ३०० कॅलरीज बर्न होतील. तुमच्या शरीरारातली एक किलो चरबी कमी करण्यासाठी ७७०० बर्न कराव्या लागतात.
७७०० आकडा लक्षात ठेवून तुम्ही आठवड्याभरात किंवा एक महिन्यात किती कॅलरी डेफीजीट ठेवता यावर किती चरबी कमी होईल हे ठरेल.
अशा पद्धतीने तुम्ही तुमचा TDEE मोजून, त्यानुसार कॅलरी डेफीजीट ठेवून तुमचं किती वजन कमी होईल याचं गणित मांडू शकता.
दूसरा एक अंदाज असा आहे की जर तुम्ही दररोज कॅलरी डेफीजीट ठेवून १०,००० पावलं चाललात तर आठवड्याला अर्धा ते एक किलो वजन कमी होऊ शकतं.
अर्थात इथं तुमच्या इतर घटकांचा रोल सुद्धा महत्वाचा ठरणार आहे. जसं की व्यायाम, तुमचा आहार, कॅलरीज नियंत्रित असणे. थोडक्यात काय तर चालल्यावर तुमचं किती वजन कमी होणार हे तुम्ही कॅलरी डेफीजीट वर आहात की नाही, किती कॅलरीज बर्न झाल्या आणि तुम्ही किती वेळ चालता यावर अवलंबून आहे.
वजन कमी करण्यासाठी किती पावलं चालावी लागतात?
किती चालल्याने पोटाची चरबी कमी होऊ शकते हा एक समानार्थी प्रश्न आहे. वजन कमी करण्यासाठी किती पावलं चालावी या प्रश्नाच्या उत्तराला तुम्ही वरच्या संशोधनाचा आधार घ्या.
पण वजन कमी होणं हे तुमच्या कॅलरी डेफीजीट वर जास्त अवलंबून असल्यामुळे मी म्हणेल की जेवढं जास्त तुम्ही चालणार तेवढ्या जास्त कॅलरीज तुम्ही बर्न करणार आहे. परिणामी तुमचं कॅलरी डेफीजीट चे प्रमाण सुद्धा वाढेल.
त्यामुळे असं काही ठराविक प्रमाण नाही की एवढं चालल्यावर तुमचं वजन कमी होईल. महत्वाचं आहे की कॅलरी डेफीजीट ठेवून चालत आहात ना.
माझ्या नुसार चालणे हा वजन कमी करण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. त्यामुळे दररोज चालणे हा तुमच्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग असू द्या.
त्यासाठी छोट्या गोष्टींमधून सुरुवात करा, जसे की घरात किंवा ऑफिसमध्ये (कामाच्या ठिकाणी) शक्य तितके चालण्याचा प्रयत्न करा, आणि हळूहळू चालण्याची वेळ वाढवा.
थोडक्यात
या ब्लॉग मध्ये आपण वजन कमी करण्याचे 5 सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय बघितले. त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसंच त्याविषयी शास्त्रीय दृष्टिकोण आणि तुमच्या दैनंदिन रूटीन मध्ये ते घरगुती उपाय कसे सहजपणे समाविष्ट करायचे याबद्दल सुद्धा चर्चा आपण केली.
यात एकूण ५ उपाय मी तुम्हाला सांगितले. ज्यात पाणी पिणे, रोज चालणे, दालचिनीचा उपयोग, लिंबूपाणी आणि गाजर-लेट्टूसचा रस असे उपाय आहेत. यापेक्षा वेगळे आणि जास्त उपाय मला तरी आजवर सापडले नाहीत.
कोणताही उपाय करत असताना एक लक्षात ठेवा की कोणताही उपाय हा जादू सारखा काम करत नाही. म्हणजे तुम्ही काही दिवस फक्त तो उपाय केला आणि वजन कमी झाले असं होणार नाही.
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या जीवनशैली मध्ये सुद्धा आवश्यक बदल करावे लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आहार, व्यायाम आणि त्या अनुषंगाने तुमची जीवनशैली यावर सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही माझे खालचे ब्लॉग वाचू शकता.
संबंधित वाचा- वजन कमी करण्यासाठी उपयोगी व्यायाम
शेवटी लक्षात ठेवा की वजन कमी करणे हा एक प्रवास आहे. आणि हा प्रवास तुमचा निरोगी आयुष्यासाठी असला पाहिजे. म्हणून एकदा वजनकमी झाले की व्यायाम, आहार चा विसर पडला असं करू नका.
म्हणून आता वेळ आली आहे कृती करण्याची !
ब्लॉग मध्ये सांगितलेल्या उपाय पैकी तुम्हाला सर्वाधिक सोपा उपाय कोणता वाटतो ? किंवा तुम्ही आधीच यापैकी काही उपाय करत असाल, तर तुमचा अनुभव माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा.
जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, तर तो तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
FAQ’s
झटपट वजन कमी करण्यासाठी काय करावे?
झटपट वजन कमी करण्यासाठी तुम्ही शास्त्रशुद्ध आणि सुरक्षित गोष्टींचा अवलंब करायला पाहिजे. Technically झटपट वजन कमी करणे याचे अनेक अर्थ होतात. तुमच्यासाठी झटपट म्हणजे किती लवकर हे महत्वाचं आहे. या संबंधी तुम्ही माझा झटपट वजन कमी करण्याविषयी ब्लॉग वाचू शकता.
कोणत्या आहारामुळे सर्वात जलद वजन कमी होते?
प्रथिनेयुक्त, फायबरयुक्त व कमी कार्ब आणि कमी कॅलरीज असणाऱ्या आहारामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते. जलद वजन कमी करण्यासाठी तुम्हाला या सोबत कॅलरी डेफीजीट ठेवावे लागेल.
एका महिन्यात वजन कमी करण्यासाठी काय खावे?
एका महिन्यात वजन कमी करण्यासाठी कॅलोरी डेफिसिट ठेवून प्रथिनेयुक्त, फायबरयुक्त व कमी कार्ब आणि कमी कॅलरीज असणाऱ्या आहारा चा समावेश करा. वजन कमी करण्यासाठी काय खावे याबद्दल मार्गदर्शनासाठी ब्लॉग वाचा.
उपवास करून आठवड्यात 2 किलो वजन कसे कमी करावे?
अधूनमधून उपवास (Intermittent fasting) (16:8 पद्धत) आणि कॅलोरी डेफिसिटचा योग्य वापर केल्यास आठवड्यात 2 किलो वजन कमी करता येतं. पण यासाठी तुम्हाला अत्याआधिक प्रमाणात कॅलरी डेफीजीट ठेवावे लागेल जे तुमच्यासाठी घातक आणि असुरक्षित ठरू शकते.
चरबी कमी करण्यासाठी अधूनमधून उपवास कसे करावे?
चरबी कमी करण्यासाठी 16:8 पद्धतीचा उपवास करा, म्हणजे 16 तास उपवास आणि 8 तास जेवणासाठी. उपवासाच्या वेळेत पाणी, ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता. उपवास संपल्यानंतर प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सचा समावेश असलेला आहार घ्या.
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Certified Nutritionist.
Experienced Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747