मधुमेह म्हणजे काय ? सोप्या भाषेत समजून घ्या या आजाराबद्दल सर्वकाही.

मधुमेह ही महत्वाची आणि तेवढीच गंभीर आरोग्य समस्या जग आणि देशभरात वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात 11 पैकी 1 व्यक्तीला मधुमेह आजार आहे. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन नुसार 2030 पर्यन्त 500 दश लक्ष लोकांपर्यंत ही समस्या पोचलेली असेल.

Contents

जागतिक आरोग्य संघटनेनुसार मधुमेह आता जगभरात टॉप 10 मृत्यूच्या कारणांपैकी एक कारण बनले आहे. या वर ह्रदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधित आजार हे सर्वात मोठे जागतील मृत्यू होण्याचे कारण आहे.

अशा या समस्या बद्दल मूलभूत माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचावी या उद्देशयाने हा ब्लॉग बनवला आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला मधुमेह म्हणजे काय, मधुमेह कशामुळे होतो, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर कशा पद्धतीने उपचार केले जातात या बद्दल प्रभावी पण तेवढ्याच सोप्या भाषेत माहिती बघायला मिळेल.

या ब्लॉग मध्ये तुम्हाला मूलभूत माहिती देण्याच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी (संकल्पना, कन्सेप्ट) अवांतर वाटतील, समजणार नाहीत. तिथे कन्फ्युज होण्याची काही आवश्यकता नाही कारण जस जस तुम्ही ब्लॉग वाचत जाल, पुढे त्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टींचा संदर्भ लक्षात येत जाईल.

चला तर मग चालू करूया.

नेमके मधुमेह म्हणजे काय किंवा डायबिटीस म्हणजे काय ?

सर्वात अगोदर तुम्हाला नेमके मधुमेह म्हणजे काय, कोणत्या परिस्थितीमुळे मधुमेह आजार उद्भवतो किंवा मधुमेह मध्ये असे काय होते ज्यामुळे तुमच्यासाठी एक आरोग्य समस्या बनते हे जाणून घ्यावे लागेल. म्हणजे एकंदर काय तर मधुमेह या आजाराची मूलभूत माहिती तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्या संबंधी इतर बारकावे तुम्हाला समजून येणार आहेत.

मधुमेह ला सामान्यपणे शुगर, साखरेचा आजार किंवा डायबेटिस असे म्हंटले जाते. मधुमेह साठी वापरले जाणारे हे सामान शब्द प्रयोग आहेत. या सर्व शब्दांचा अर्थ हा मधुमेह च आहे. त्यामुळे यानंतर या पैकी कोणताही शब्द आला तर कन्फ्युज न होता तोच अर्थ समजून घ्या.

मधुमेह कशामुळे होतो किंवा मधुमेह कसा होतो?

नेमका मधुमेह कशामुळे होतो, शरीरात असे काय घडते की तुम्हाला मधुमेह किंवा शुगर चे निदान होऊन त्या संबंधीचा त्रास जाणवायला लागतो, हे तुम्ही आता समजून घ्या.

आपण जे अन्न खातो त्याचे पचन आणि विघटन होऊन त्याचे वेगवेगळे पोषक घटक जसे विटामीन, प्रोटीन, ग्लुकोज, मिनरल, हे आपल्या रक्तात मिसळतात आणि नंतर मग ते जिथे ऊर्जेची गरज असेल त्या ठिकाणी पोचुन तिथे ऊर्जा प्रदान करतात.

थोडक्यात काय तर हे सर्व घटक आधी रक्तात मिसळतात आणि मग गरजेनुसार शरीरातील पेशी आणि अवयव या मध्ये शोषले जाते.

पण काही वेळा यापैकी ग्लुकोज (blood glucose) हा घटक रक्तात मिसळून पेशींमध्ये शोषला जात नाही. त्यामुळे ग्लुकोज रक्तातच राहते. यामुळे रक्तातील एकूण ग्लुकोज ची पातळी वाढते. आवश्यकते पेक्षा पेक्षा जास्त वाढते. ज्यामुळे पुढच्या गुंतगुंतीला सुरुवात होऊन तुम्हाला त्रास व्हायला लागतो. यालाच मधुमेह किंवा शुगर म्हणतात.

रक्तामध्ये ग्लुकोज किंवा साखरेचे प्रमाण

थोडक्यात आणि सोपे सांगायचे झाल्यास जेव्हा तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज किंवा साखरेचे प्रमाण गरजेपेक्षा किंवा अनावश्यक पद्धतीने वाढते तेव्हा मधुमेह ची स्थिति किंवा आजार निर्माण होतो. यालाच सामान्य भाषेत शुगर, साखर किंवा डायबिटीस झाला असे देखील म्हणतात.

रक्तातील ग्लुकोज कशामुळे वाढते?

आता हे ग्लुकोज किंवा तुमच्या भाषेत साखर रक्तात जमा का होत जाते. रक्तातील साखर का वाढते. पेशींमध्ये किंवा अवयवांमध्ये का शोषले जात नाही याची कारणे आणि कारणमीमांसा म्हणजेच मधेमह चे सर्व रामायण आणि महाभारत आहे. पण चिंता नको. तुम्हाला समजेल आणि पूर्ण अचूक महिती मिळेल अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे समजून सांगतो.

आपल्या शरीरात प्रत्येक क्रिया, त्यावर प्रतिक्रिया, जैविक प्रक्रिया, अनेक रासायनिक प्रक्रिया या नियंत्रित प्रमाणात होत असतात. शरीराला ज्या वेळेस जशी, जिथे आणि जेवढ्या प्रमाणात ज्या गोष्टीची गरज असते ती गोष्टी पुरवली जाते. या सर्व विशिष्ठ क्रिया नियंत्रित ठेवण्यासाठी विशिष्ठ घटक लागत असतात, इथे ग्लुकोज च्या बाबतीत देखील तसेच आहे.

शरीराला किती प्रमाणात ग्लुकोज ची गरज आहे किंवा किती जास्त ग्लुकोज रक्तात वाढले आहे या नुसार रक्तात आणि शरीरातील पेशींमध्ये ग्लुकोज चे शोषण आणि प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी इंसुलिन (insulin) नावाचे हॉरमोन महत्वाचे असते. थोडक्यात काय तर रक्तात ग्लुकोज वाढणार की योग्य त्या प्रमाणात राहणार याचे नियंत्रण करणारे इंसुलिन हॉरमोन.

आता इंसुलिन एवढी महत्वाची भूमिका पार पाडतो म्हंटल्यावर त्या इंसुलिन संबंधी देखील थोडी माहिती असणे आवश्यक आहे.

इन्सुलिन म्हणजे काय आणि त्याचे कार्य?

इन्सुलिन म्हणजे काय आणि त्याचे कार्य?

इंसुलिन एक प्रकारचे हॉरमोन आहे. हे इंसुलिन हॉरमोन स्वादुपिंड (pancreas) नावाच्या लंबाकृती ग्रंथी किंवा अवयवामध्ये तयार होत असते. स्वादुपिंड मध्ये अल्फा आणि बेटा (Islets of Langerhans) नावाच्या दोन पेशी असतात. त्यात बेटा नावाच्या पेशीकडून इंसुलिन हॉरमोन तयार होते.

आता हे इंसुलिन 2 पद्धतीने तुमच्या मध्ये मधुमेह ची उत्पत्ति करू शकते.

  • स्वादुपिंड च्या बेटा पेशींकडून इंसुलिन च तयार होत नसेल किंवा कमी प्रमाणात तयार होत असेल.
  • दुसरे म्हणजे शरीरात इंसुलिन तयार होत आहे, त्याचे प्रमाण ही योग्य आहे, पण शरीर किंवा शरीरातील पेशी त्या इंसुलिन ला प्रतिक्रिया देत नाहीत. म्हणजे शरीराची त्या इंसुलिन प्रती संवेदनशीलता (insulin resistance) कमी होणे किंवा अजीबात नसणे.
आपल्या शरीरात इन्सुलिनची भूमिका काय आहे?

आपल्या शरीरात इंसुलिनची खूप महत्वाची भूमिका असते. इंसुलिन ची महत्वाची दोन कार्य आहेत,

  • रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवणे.
  • शरीरात गरजेप्रमाणे ऊर्जा निर्माण करणे.

म्हणूनच इंसुलिन तयार न झाल्यास किंवा कमी प्रमाणात तयार होत असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि तुम्हाला मधुमेह होतो. त्यामुळे मधुमेहाच्या काही रुग्णांवर इन्सुलिनचा उपचार केला जातो. हे इंसुलिन एवढे महत्वाचे आहे की हे तयार नाही झाले तर मधुमेह असलेल्या बहुतेक लोकांसाठी इंसुलिनचे इंजेक्शन दैनंदिन पथ्येचा एक आवश्यक भाग बनून जातो.

इन्सुलिन चा काय परिणाम होतो ?

शरीरात इन्सुलिन चे परिणाम दोन पद्धतीने घडून येत असतात. ते म्हणजे,

  • रक्तात आलेले ग्लुकोज ऊर्जा तयार करण्यासाठी जिथे ज्या प्रमाणात लागेल त्या पद्धतीने शोषून घेतल्या जाते.
  • दूसरा एक परिणाम असा होतो की तुम्ही जेवल्यानंतर रक्तात ग्लुकोज वाढताच इंसुलिन इथे येऊन त्याचे प्रमाण नियंत्रित करते. म्हणजे इतर पेशींकडून ग्लुकोज शोषून घेण्यास भाग पाडले जाते.

इंसुलिन बद्दल एवढीच माहिती तुम्हाला जाणून घेणे पुरेशी आहे.

आता आपण आपल्या पुढच्या महितीकडे वळूया.

मधुमेहाचे किती प्रकार आहेत ? डायबिटीस चे प्रकार

डायबिटीस चे अनेक प्रकार आहेत. त्याची नावे आपण बघणार आहोत. पण त्याची जे मुख्य दोन प्रकार आहेत. त्याची थोडी सविस्तर माहिती जाणून घेणे तुम्ही महत्वाचे आहे.

१. टाइप 1 डायबिटीज/ टाइप 1 मधुमेह

या प्रकारच्या मधुमेह ला टाइप 1 मधुमेह म्हटले जाते. यासाठी इतर नावे देखील वापरली जातात जसे क juvenile diabetes, insulin dependent diabetes. मधुमेह असणाऱ्या 5 ते 10 टक्के लोकांमध्ये या प्रकारचा मधुमेह आढळतो.

काही वेळा स्वादु पिंड मधील इंसुलिन तयार करणाऱ्या बेटा पेशी या उद्ध्वस्त होतात किंवा त्यांचे कार्य त्या व्यवस्थित पार पाडू शकत नाहीत, परिणामी त्यांच्याकडून इंसुलिन चे उत्पादन होत नाही. परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण शोषले जात नाही. यामुळे आपोआप रक्तातील शुगर चे प्रमाण वाढत जाते.

अशा वेळी या मधुमेह ला टाइप १ मधुमेह म्हणावे.

२. टाइप 2 डायबिटीज/ टाइप 2 मधुमेह

अधिक प्रमाणात लोकांना होणारा हा प्रकार आहे. मधेमह असणाऱ्या 95 टक्के लोकांना टाइप 2 मधुमेह असतो. म्हणजे टाइप 2 मधुमेह हा खूप सामान्य पणे आढळणारा मधुमेह आहे.

यामध्ये होते असे की आपले शरीर म्हणजे पेशी किंवा अवयव म्हणा, इंसुलिन ला प्रतिसाद देण्याचे बादण करतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर शरीराची इंसुलिन प्रती संवेदनशीलता कमी होते. यामुळे असे होते की इंसुलिन असून देखील त्याचा शरीराला काही उपयोग होत नाही.

आता शरीर इंसुलिन ला का प्रतिसाद देत नाही यासाठी वेगळी कारणे आहेत आणि तो विषय ही वेगळा. या बाबतीत इतर केव्हातरी सविस्तर बोलूया.

या व्यतिरिक्त डायबिटीज चे इतर ही प्रकार आहेत, ते थोडक्यात बघूया.

  • Gestational Diabetes– गर्भधारनेच्या दरम्यान जर तुमच्या रक्तातील ग्लुकोज पातळीत वाढ झाली तर त्यातून जो मधुमेह उत्पन्न होतो त्याला gestational diabetes म्हणतात.
  • Neonatal diabetes– हा मधुमेह नवजात बाळकांमध्ये आढळतो. जर नवजात बालकांच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये इनसुलीनच्या कार्यामध्ये बिघाड होऊन रक्तात साखरेचे अतिरिक्त प्रमाण असेल तर त्याला neonatal diabetes म्हणतात.
  • Latent Autoimmune diabetes in Adults (LADA)हा मुळता टाइप 1 मधुमेह चा प्रकार आहे. पण टाइप 1 पेक्षा उशिराने हा रुग्णांमध्ये आढळतो म्हणून याला वेगळे नाव देण्यात आले. कारण टाइप 1 मधुमेह हा सामान्यता सुरुवातीच्या वयाच्या 15 ते 20 वर्षांपर्यंत आढळतो. पण काही व्यक्तींमध्ये इंसुलिन तयार होण्याचे काम हळुवार पणे थांबते म्हणून वयाच्या उशिरा याचे लक्षण आढळतात.

मधुमेह किंवा डायबिटीस होण्याची कारणे

तुम्ही हे बघितले की मुख्य दोन कारणांमुळे मधुमेह आढळतो.

  • एक म्हणजे इंसुलिन चा अभाव असणे (इंसुलिन तयार न होणे)
  • दुसरे म्हणजे शरीर इंसुलिन ला प्रतिसाद देत नसणे

आता या दोन्ही परिस्थिति उत्पन्न करायला जे घटक कारणीभूत ठरतात त्याची माहिती या ठिकाणी बघणार आहोत.

म्हणजे खाललीलपैकी कोणत्याही कारणांमुळे एक तर इंसुलिन तयार होण्याचे थांबते किंवा शरीर इंसुलिन ला प्रतिसाद देण्याचे बंद करते. खूप विस्तृत सांगावी अशी काही कारणे आणि या बाबतीत फार सविस्तर असा अभ्यास किंवा शोध झाला आहे असे नाही. तरी देखील तुम्हाला या बाबतचे माहिती मिळेल आणि समजून येईल यासाठी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगतो.

१. जनुकीय बदल (Genetic changes)

गर्भधारणा झाल्यावर किंवा प्रसूती पश्चात शरीरात असे काही जनुकीय बदल होतात ज्यामुळे तुमच्या स्वादु पिंड मधील बेटा पेशी इंसुलिन तयार करत नाही. हे कारण neonatal diabetes आणि टाइप 1 मधुमेह साठी कारणीभूत ठरते.

२. स्वादु पिंड चे आजार

बऱ्याच वेळ स्वादु पिंड मध्ये वायरस संक्रमण किंवा इतर आजार होतात. अशा वेळी स्वादु पिंड मधील बेटा पेशी नष्ट होतात ज्यामुळे इंसुलिन तयार होऊ शकत नाही. अशा वेळी टाइप 1 मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

३. वजन जास्त असणे / लठ्ठपणा

तुमचे वजन जास्त असेल, चरबी चे प्रमाण जास्त असेल, विशेष करून पोटा समोर ची चरबी तर तुम्हाला टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता अधिक राहते. कारण अतिरीरक्त वजन हे शरीरात असे बदल घडवून आणते ज्यामुळे तुमचे शरीर आणि शरीराच्या पेशी इंसुलिन शोषून घेऊ शकत नाही.

थोडक्यात तुमचे शरीर इंसुलिन ला प्रतिसाद देत नाहीत. याला insulin resistance म्हणतात.

४. आहार

तुमचे वजन आणि मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी जेवढा आहार महत्वाचा आहे. तेवढाच तो मधुमेह उत्पन्न करण्यामध्ये किंवा टाळण्यास देखील महत्वाचा ठरतो. तुमच्या आहारात जर जास्त गोड पदार्थ म्हणजे शुगर असणारे, कर्बोदके (carbohydrates), फॅटी ऍसिड (fatty acids) असणारे पदार्थ , रिफाईन तेल असणारे पदार्थ असेल तर त्यामुळे इंसुलिन रेसिसटन्स (insulin resistance) तयार होऊन टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

५. तणाव

दीर्घकाळ असणारा तणाव, मानसिक नैराश्य तुमचे हॉरमोन अनियंत्रित करतो. यामुळे सुद्धा टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

६. शारीरिक हालचाल नसणे

व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचाल नसणे, बसून जॉब असणे या गोष्टी तुमच्या शरीरात इंसुलिन ला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी करतात. दीर्घकाळ या गोष्टी मधुमेह साठी आमंत्रण ठरतात.

निदान

तुम्हाला डायबिटीस किंवा मधुमेह आहे हे कसे ओळखावे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असावा. यासाठी तुम्ही फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  • मधुमेह च्या लक्षणांमद्धे तुमच्या मध्ये काही लक्षण जाणवत आहेत का ?
  • जर तुमच्या मध्ये मधुमेह चे लक्षणे जाणवत असतील तर पुढे मधुमेह चे निदान निश्चित करण्यासाठी डॉक्टरांकडे जावे.

तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांच्या सल्ल्याने काही टेस्ट कराव्या लागतात. त्याची थोडक्यात माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.

  • रॅनडम शुगर (random sugar)– ही टेस्ट तुम्हाला कोणत्याही वेळेला करता येते. म्हणजे यासाठी जेवण करण्याची किंवा नाही करण्याची अट नसते. दिवसाच्या कोणत्याही वेळेला ही टेस्ट करू शकता. यामध्ये जर तुमच्या रक्तातील ग्लुकोज 200 mg/dl पेक्षा जास्त किंवा समान असेल तर तुम्हाला मधुमेह असल्याचे निश्चित करून त्यानुसार डॉक्टर तुमच्यावर उपचार चालू करतील.
  • फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज (fasting plasma glucose)– रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी ही टेस्ट तुम्हाला उपाशी पोटी करावी लागते. म्हणजे टेस्ट पूर्वी किमान 8 तास काहीही खाणे किंवा पिणे (शिवाय पाणी) चालत नाही. यामध्ये जर तुमचे रीपोर्ट 126 mg/dl एवढे किंवा यापेक्षा जास्त आले तर तुमचे मधुमेह चे निदान होते.
  • ग्लुकोज टोलरन्स टेस्ट (glucose tolerance test)– ही टेस्ट फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज च्या नंतर करावयाची टेस्ट आहे. फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज टेस्ट केल्यानंतर साखरयुक्त पेय घ्यायचे आहे जसे की चहा, आणि त्यानंतर दोन तासांनी ही ग्लुकोज टोलरन्स टेस्ट तुम्ही करायची आहे. यामध्ये दोन तासांनंतर 200 mg/dl पेक्षा जास्त रीडिंग म्हणजे तुम्हाला मधुमेह आहे.

अशा पद्धतीने आणि या टेस्ट करून तुमच्या मधुमेह चे निदान करून त्यानुसार त्यावर उपचार आणि इतर जीवनशैलीत करायचे बदल सुचवले जातात.

मधुमेह ची लक्षणे व उपचार (डायबिटीज ची लक्षणे आणि उपचार)

लक्षणे –

शुगर मध्ये किंवा मधुमेह मध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आणि वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसत असतात. ही लक्षणे जाणून घेण्याआधी तुम्हाला जाणून घ्यावे लागेल की वाढलेली शुगर किंवा मधुमेह तुमच्या शरीरात कुठे परिणाम करतात.

वाढलेली शुगर किंवा मधुमेह तुमच्या शरीरात विशेषकरून तीन ठिकाणी सर्वात जास्त नुकसान करतात.

  • किडनी
  • डोळा
  • मज्जा संस्था

वाढलेली शुगर तुमच्या शरीरात सर्वात जास्त इथेच आघात करते. त्यामुळे तुम्हाला जी काही लक्षणे जाणवतील ती याच तीन गोष्टी संबंधित असतील. तुम्हाला मधुमेह मध्ये खालील पैकी सर्वच लक्षणे जाणवतील असे नाही आणि सर्वच लक्षणे जाणवायला हवेत असे ही नाही.

खालील पैकी सर्व लक्षणे ही जाणवू शकतात किंवा कोणतेही एक लक्षण जरी जाणवले तरी त्यावरून तुम्हाला मधुमेह आहे असे निदान करता येऊ शकते.

डायबिटीज ची लक्षणे

थकवा जाणवणे

जेव्हा तुमच्या रक्तातील साखर उर्जे साठी अवयव किंवा पेशींकडून शोषले जाणार नाही तेव्हा शरीराला उर्जेचा अभाव होईल त्यामुळे थकवा जाणवेल.

अंधुक दृष्टी

रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण हे डोळ्याच्या लेन्स मध्ये जाऊन लेन्स खराब करू शकतात. यामुळे तुमच्या डोळ्याची दृष्टी अंधुक होते.

वारंवार लगवीला जावे लागणे

जेव्हा तुमची शुगर रक्तातच राहते तेव्हा ती लगवी सोबत मिसळले जाऊन लगवी चे प्रमाण वाढते, यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा लगवी ला जावे लागू शकते.

वारंवार तहान लागणे

वारंवार लगवी झाल्यावर शरीरात पाण्याची कमतरता होते. यामुळे तुम्हाला वारंवार पाणी प्यावे लागते.

वजन कमी होणे

उर्जेचा मुख्य स्त्रोत असणारे ग्लुकोज जेव्हा रक्तातच राहते आणि शरीरातील पेशींना उर्जेचा इतर स्त्रोत मिळत नाही तेव्हा पेशी फॅट आणि तुमच्या स्नायू मधील साचून ठेवलेले ग्लुकोज वापरते. यामुळे तुमचे शरीराचे वजन कमी व्हायला लागते.

गुप्तांगांना खाज सुटणे

रक्तातील वाढलेली साखर candida सारख्या जननेंद्रिय ठिकाणी होणाऱ्या संक्रमानांना अनुकूल वातावरण तयार करते. यामुळे त्या ठिकाणी वारंवार संक्रमण होऊन खाज सुटते.

जखम लवकर भरून न येणे

रक्तातील वाढलेली साखर ही तुमच्या रक्तावहिन्या खराब करतात. त्यामुळे त्यांच्या द्वारे होणारा शरीराला आणि कोणत्या ही जखमेच्या ठिकाणी रक्तपुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे तुम्हाला झालेली कोणत्याही प्रकारची जखम लवकर भरून येत नाही.

तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातील कुणाला ही वरील पैकी कोणते ही एक किंवा पूर्ण लक्षणे जाणवत असतील तर मधुमेह चे निदान करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण योग्य वेळी निदान आणि उपचार मधुमेह संबंधी इतर गुंतागुंत आणि आजाराची गंभीरता कमी करतात.

उपचार

मधुमेह मध्ये केला जाणारा उपचार हा गुंतागुंतीचा आणि विशिष्ठ उद्दिष्ट लक्षात ठेवून केला जाणारा असतो. म्हणजे किती शुगर वाढली आणि किती कमी करायला पहिजे वगैरे गोष्टी लक्षात घ्यावा लागतात. कारण मधुमेह साठी उपचार ठरवताना शुगर अचानक खालच्या पातळी ला जाऊ नये याची सुद्धा खबरदारी घ्यावी लागते.

डॉक्टर तुम्हाला मधुमेह चे निदान झाल्यावर त्यावर कोणत्या प्रकारचा उपचार करायचा हे इतर बरेच घटक लक्षात ठेवून ठरवतील. तुम्हाला एक साधारण माहिती असावी या दृष्टीने मधुमेह चा उपचार कसा असतो किंवा डॉक्टर कसा ठरवतात याची माहिती इथे मी तुम्हाला देणार आहे.

मधुमेह चा उपचार ठरवताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.

  • कोणत्या प्रकारचा मधुमेह आहे (जसे की टाइप 1 की टाइप 2)
  • तुमचे वय
  • मधुमेह चे निदान करण्यासाठी केलेल्या तपासणी चे निकाल (fasting, glucose tolerance test, random sugar)

सुरूवातीला महत्वाच्या या 3 घटकांचा विचार तुमचे मधुमेह चे उपचार ठरवताना केला जातो. तो कसा आणि कशासाठी केला जातो त्याची थोडी अजून सविस्तर माहिती जाणून घेऊया.

डायबिटीज चे उपचार

टाइप 1 डायबिटीस उपचार

टाइप 1 मधुमेह मध्ये तुमच्या शरीरात इंसुलिन तयार होत नाही, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे नियंत्रण होऊ शकत नाही. अशा वेळी उपचारासाठी तुम्हाला इंसुलिन चे इंजेक्शन घ्यायचा सल्ला दिला जातो. कारण याशिवाय दूसरा कुठलाच आणि कोणताच पर्याय सध्या तरी उपलब्ध नाही.

या इंसुलिन च्या इंजेक्शन बाबतीत इतर घटक ही लक्षात ठेवावे लागतात जसे की

  • किती इंसुलिन द्यायचे
  • कोणत्या प्रकारचे इंसुलिन द्यायचे
  • वाढलेल्या साखरेचे प्रमाण
  • तुम्ही घेत असलेला शुगर युक्त आहार.

टाइप 1 मधुमेह मध्ये इंसुलिन इंजेक्शन जर प्रभावी म्हणजे उपयोगी ठरत नसतील तर अशा वेळी इंसुलिन तयार करणारे स्वादुपिंड किंवा islets of Langerhans चे प्रत्यारोपण सुद्धा केले जाते.

टाइप 2 डायबिटीस उपचार

टाइप 2 मधुमेह असेल तर यासाठी केला जाणारा उपचार वेगळा असतो. पण क्वचित वेळा या प्रकारामध्ये सुद्धा तुम्हाला कधी कधी इंसुलिन चे इंजेक्शन वापरायचा सल्ला दिला जाऊ शकतो. पण बहुतेक वेळा टाइप 2 मधुमेह असेल तर इंसुलिन च्या injection ची गरज पडत नाही.

टाइप 2 मधुमेह मध्ये महत्वाच्या 3 टप्प्यांमध्ये उपचार केले जातात.

  • औषधोपचार
  • आहार
  • व्यायाम

टाइप 2 डायबिटीस हा बहुतेक वेळा या तीन गोष्टींचे सुनियोजित पद्धतीने अवलंब केला नियंत्रणात राहतो.

तेव्हा डॉक्टर तुम्हाला तुमचे तपासणी चे निकाल, वय आणि इतर घटक ठरवून औषधोपचार ठरवतात आणि त्याचसोबत तुमच्या जीवनशैली मध्ये करावयाच्या बदलांविषयी मार्गदर्शन करतील.

थोडक्यात

मधुमेह हा क्लिष्ट आणि तेवढाच गंभीर आजार आहे. समाजामध्ये मधुमेह असणारे रुग्ण दिवसेंदिवस अविश्वसनीय प्रमाणात वाढत आहेत. यामध्ये तरुण, वृद्ध, स्त्रिया, पुरुष आणि लहान मुले सुद्धा आहेत. मधुमेह झालेल्या व्यक्तिमध्ये आजार आटोक्यात आणणे खूप जिकरीचे किंवा म्हणतीचे काम ठरू शकते. त्यामुळे मधुमेह होऊच नये यासाठी आपण प्रयत्न करायला हवे.

मधुमेह बद्दल सामान्य मूलभूत माहिती असणे आणि तो टाळण्यासाठी वैयक्तिक आयुष्यात करावयाचे बदल जसे निरोगी आहार, व्यायाम, पुरेशी झोप या गोष्टी अवलंबणे महत्वाचे आहे.

त्याच अनुषंगाने या ब्लॉग मध्ये आपण मधुमेह म्हणजे नेमके काय, तो कशामुळे होतो आणि इतर माहिती जसे लक्षणे कारणे, निदान आणि मधुमेह वर उपचार याची काही सविस्तर तर काही थोडक्यात माहिती बघितली. या माहिती च्या आधारे तुम्हाला किंवा तुमच्या घरच्यांना या संबंधित काही लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांना भेटून सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे. त्याच पद्धतीने या माहिती चा उपयोग करून तुम्ही तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका कमी करू शकता.

मधुमेह बद्दल तुम्हाला सर्व मूलभूत माहिती समजली असेल अशी अपेक्षा ठेवतो. माहिती आवडली असेल तर कमेन्ट करून नक्की कळवा धन्यवाद.

FAQ’s

मधुमेह कोणत्या वयात होतो?

मधुमेह कोणत्याही वयात होऊ शकतो. टाइप 1 मधुमेह हा लहान मुळे, तरुण तर टाइप 2 मधुमेह हा 40 वर्ष किंवा त्याहून अधिक वयातील लोकांना होण्याची शक्यता अधिक असते.

मी घरी मधुमेहाची चाचणी कशी करू शकतो?

हो, तुम्ही मधुमेहाची चाचणी घरी करू शकता. ग्लुकोमिटर नावाच्या उपकरण वापरून तुम्ही रॅनडम शुगर ची चाचणी करू शकता.

कोणत्या वयोगटातील लोकांना मधुमेहाचा सर्वाधिक त्रास होतो?

वर सांगीतल्याप्रमाणे मधुमेह कोणत्या ही वयात होऊ शकतो. जसे की टाइप 1 मधुमेह हा लहान आणि तरुणांमध्ये तर टाइप 2 मधुमेह हा प्रौढ लोकांमध्ये होण्याची शक्यता अधिक असते.

टाइप 1 मधुमेह बरा होऊ शकतो का?

टाइप 1 मधुमेह हा पूर्णपणे बरा होणे अवघड असते. कारण तिथे इंसुलिन ची गरज असते. ही गरज बाहेरून पुरवावी लागते. पण आहार, इंसुलिन आणि जीवनशैली च्या आधारे तुमचा टाइप 1 मधुमेह हा नियंत्रणात राहू शकतो.

मधुमेह 2 बरा होऊ शकतो का?

मधुमेह 2 हा बरा होऊ शकतो. दीर्घकाळ औषधी, जीवनशैली आणि आहार या गोष्टी पाळल्या तर मधुमेह 2 हा एका टप्प्यावर पूर्णपणे बरा होऊ शकतो

Leave a Comment