कल्पना करा की तुम्ही घरी आहात किंवा प्रवास करताय आणि अचानक तुमचं डोके दुखायला लागतं, धाप लागते, आणि छातीत दडपण जाणवतं. अशा वेळी तुम्ही काय करताल ?
आणि जर वरचे लक्षणे तुमचा रक्तदाब (बीपी) वाढल्यामुळे असेल, मग तर अजून जास्त गंभीर.
बऱ्याच जणांच्या बाबतीत अशी परिस्थिति येते. म्हणजे अचानक बीपी वाढल्यावर काय करावे हे त्यांना माहितीच नसतं.माहीत नसल्यामुळे ते योग्य वेळी योग्य उपाय योजना करू शकत नाही. परिणामी रुग्ण अधिक गंभीर होतो.
जगात जवळपास १.५ बिलियन लोकांना उच्च रक्तदाब म्हणजेच बीपी चा त्रास आहे. या १.५ बिलियन लोकांमधील ५४ टक्के लोकांना बीपी मुळे हार्ट अटॅक म्हणजेच ह्रदयविकार येण्याच्या घटना घडतात.
म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या ५४ टक्के लोकांना जर बीपी वाढल्यावर काय करावे याबद्दल ची माहिती असती तर कदाचित ते हार्ट अटॅक पर्यन्त पोचले नसते.
म्हणून इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की अचानक रक्तदाब वाढल्यावर लगेच काय उपाय करता येईल? आणि, अशा परिस्थितीत तुम्ही काय करू नये?
तर आजच्या या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला अचानक बीपी वाढल्यावर काय करावे याबद्दल वस्तुनिष्ठ आणि सखोल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे.
चला तर मग.
संबंधित वाचा – हार्ट अटॅक कशामुळे येतो ?
बीपी वाढल्यावर काय करावे हे जाणून घेण्याअगोदर या गोष्टी क्लियर करा
बीपी चा त्रास असणे आणि अचानक बीपी वाढणे या दोन संपूर्णता वेगवेगळ्या घटना आहेत. याचे कारण असे की दोन्ही घटनांसाठी वेगवेगळे कारण कारणीभूत ठरतात आणि त्यानंतर त्यांचे उपचार देखील वेगवेगळे असतात.
बीपी चा त्रास कसा होतो ?
तुम्हाला जेव्हा सतत डोकेदुखी, छाती दुखणे, दम लागणे, सतत डोळे दुखणे अशी लक्षणे जाणवतात त्यावेळी तुम्हाला बीपी चा त्रास असण्याची शक्यता असते. हा त्रास काही वेळ आनुवंशिक पण असू शकतो.
वरील लक्षणे जाणवल्यास तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याविषयी योग्य तपासणी, निदान आणि उपचार घेता. उपचारा मध्ये ते औषधोपचार तसेच तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनशैली मध्ये काही बदल करण्यास सांगत असतात.
उच्च रक्तदाब च्या उपचारासाठी तुम्हाला बीपी नियंत्रित राहण्यासाठी नेहमीसाठी एक गोळी दिली जाते. ही गोळी तुम्ही डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे रोज घ्यायची असते. अशा वेळी तुम्हाला बीपी चा त्रास आहे असे आपण म्हणू शकतो. तो बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला रोज गोळी घ्यावी लागते ज्यामुळे तुमचे डोकेदुखी वगैरे जे लक्षणे असतील, ती लक्षणे कमी होतात.
थोडक्यात सांगायचे म्हणजे यामधे अत्यायिक म्हणजे एमर्जन्सि सारखी काहीही परिस्थिति नाही. यामधे तुम्हाला बीपी चा त्रास आहे पण तो नियंत्रित आहे आणि पुढेही नियंत्रित राहू शकतो. तसेच तुम्हाला या परिस्थिति मध्ये जे उपचार दिले जातात ते उपचार देखील सौम्य असतात.
अचानक बीपी वाढणे म्हणजे ?
अचानक बीपी वाढणे किंवा बीपी हाय होणे ही एक वेगळी घटना. अचानक बीपी वाढण्यासाठी त्याची कारणे, समप्राप्ती आणि उपचार हे सामान्यपणे वेगळी ठरतात. काही वेळा बीपी चा त्रास असणाऱ्यांमध्ये अचानक बीपी वाढणे किंवा हाय होण्याच्या घटना घडू शकतात. हे विशेषकरून डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचार आणि जीवनशैलीकडे दुर्लक्ष करत असलेल्या व्यक्तींमध्ये जास्त घडत असते.
सर्वांना माहीत असेल की नॉर्मल बीपी हा १२०/८० एवढा असतो. उच्च रक्तदाब पातळी चे वर्गीकरण सुद्धा केलेल आहे. त्यामध्ये मी जाणार नाही. त्यासाठी इथे सविस्तर वाचा.
अचानक बीपी वाढण्यासंबंधी दोन संकल्पना तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. जेव्हा तुमचा अचानक बीपी वाढतो तेव्हा त्याला वैद्यक शास्त्रानुसार हायपरटेन्सिव्ह क्राईसीस (hypertensive crisis) म्हणतात.
ही हायपरटेन्सिव्ह क्राईसीस दोन पद्धतीची असतात.
- हायपरटेन्सिव्ह अर्जनसी (hypertensive urgency)
- हायपरटेन्सिव्ह एमर्जन्सि (hypertensive emergency)
या ब्लॉग च्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला या दोन संकल्पना समजून घेणे महत्वाचे आहे. उच्च रक्तदाब संबंधी प्रतिबंध, शोध, मूल्यांकन करणाऱ्या जाइंट नॅशनल कमिटीने यांनी हायपरटेन्सिव्ह अर्जनसी आणि हायपरटेन्सिव्ह एमर्जन्सि यांची व्याख्या केलेली आहे. त्याप्रमाणे त्याचे विश्लेषण समजून घेऊया.
१. हायपरटेन्सिव्ह अर्जनसी
जेव्हा तुमचा बीपी १८०/१२० होतो, पण त्या अनुषंगाने तुम्हाला त्याची कोणती ही लक्षणे जाणवत नाही. तेव्हा त्या परिस्थितीला हायपरटेन्सिव्ह अर्जनसी असे समजावे. अशा परिस्थितिमध्ये तुम्ही ५ मिनीटे थांबून पुन्हा एकदा तुमचा बीपी मोजायचा आहे. कारण अशा परिस्थितिमध्ये बीपी आपोपप कमी होण्याची शक्यता असते. पण जर दुसऱ्यांदा सुद्धा तुमचा बीपी पहिल्या एवढाच असेल तर मात्र तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावे लागेल नाहीतर अॅम्ब्युलेन्स बोलवून त्यामध्ये रुग्णाला हॉस्पिटल ला घेऊन जावे लागेल.
२. हायपरटेन्सिव्ह एमर्जन्सि
या परिस्थितिमध्ये सुद्धा तुमचा बीपी १८०/१२० असतो. पण इथे बीपी वाढण्याव्यतिरिक्त तुम्हाला इतर लक्षणे ही जाणवू लागतात जसे छाती मध्ये दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, नजर कमजोर होणे, हात-पायांना मुंग्या येणे, उलटी होणे. अशा वेळी तुम्हाला कोणताही वेळ वाया न घालवता लवकरात लवकर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे.
या दोन्ही संकल्पना समजून घेताना, या ब्लॉग विषयी मुद्दा सुद्धा बघावा लागेल. तो म्हणजे की अशी परिस्थिति उद्भवली तर काय करावे किंवा दुसऱ्या तुमच्या दुसऱ्या भाषेत त्या प्रश्नाचे विश्लेषण केले तर असे होईल की हाय बीपी वाढल्यावर काय करावे ?
आपण जो हायपरटेन्सिव्ह क्राईसीस मुद्दा समजून घेत आहे तो समजून घेताना वरील प्रश्नाच्या उत्तराला आणि प्रत्यक्ष पणे या ब्लॉग च्या विषयाला सुरुवात करुयात.
संबंधित वाचा – हार्ट अटॅक येऊ नये म्हणून कोणती औषधे वापरतात ?
अचानक बीपी वाढल्यावर लगेच हे उपाय करा
कोणत्याही परिस्थितिमध्ये जेव्हा अचानक बीपी वाढतो तेव्हा ती एक एमर्जन्सि परिस्थिति असते हे आपण समजून घ्यायला हवे. या संपूर्ण प्रक्रियेत अनेक गुंतागुंतीच्या घटना घडत असतात. तसेच यामधे एंड ऑर्गन म्हणजे वाढलेल्या बीपी मुळे इतर अवयव देखील प्रभावित होत असतात. त्यामुळे अशा परिस्थितिमध्ये ह्रदय आणि इतर अवयवांना सुद्धा गंभीर दुखापत होऊन त्यांचे कार्य विस्कळीत किंवा बिघडण्याची शक्यता अधिक असते.
त्यामुळे अशा परिस्थिति मध्ये वाढलेला बीपी किंवा उच्च रक्तदाब हा नियंत्रित आणि सुरक्षित पातळी वर आणणे महत्वाचे ठरते. आता या यामध्ये आपण किती बीपी कमी करतो हे पण महत्वाचे ठरते. अशा परिस्थितिमध्ये एकदम बीपी खालच्या पातळीत आणला तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी तो नियंत्रित आणि सुरक्षित पातळीत आणणे महत्वाचे आहे.
वाढलेला बीपी किती कमी करावा आणि कोणती चिकित्सा त्या व्यतिरिक्त द्यावी या सर्व गोष्टी डॉक्टरांच्या शिवाय शक्य नाही. कारण याची चिकित्सा ही अचानक बीपी वाढण्याचे कारण, रुग्णाची सध्याची परिस्थिति, तसेच व्यक्तीचे इतर आजार हे घटक लक्षात घेऊन करावी लागते. त्यामुळे बीपी वाढल्यावर काय करावे याचे पहिले उत्तर त्याच संबंधी आहे.
१. वैद्यकीय सेवा
अचानक बीपी जेव्हा वाढतो किंवा हायपरटेन्सिव्ह क्राईसीस सारखी परिस्थिति जेव्हा निर्माण होते तेव्हा बीपी सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीने कमी करणे अत्यंत गरजेचे असते. अशा वेळी हीच एक प्राथमिकता असते. त्यामुळे ही सर्व परिस्थिति वैद्यकीय सेवेच्या हस्तक्षेपा शिवाय शक्य नाही.
याचमुळे रुग्णाला हॉस्पिटल मध्ये भरती करणे किंवा लवकरात लवकर डॉक्टरांचा हस्तक्षेप महत्वाचा असतो. अशा वेळी कोणत्याही कारणांमुळे बीपी वाढला तर रुग्णाला लवकरात लवकर वैद्यकीय उपचार कसे देता येतील हा विचार करावा.
२. दीर्घश्वास घ्या
अचानक वाढलेला बीपी हा तज्ञांच्या हस्तक्षेपानंतरच नियंत्रित होऊ शकतो हे सत्य आपण समजून घेतले आहे. पण बऱ्याच वेळा वस्तुस्थितीचा विचार केला तर काही प्रश्न उभे राहतात. अशा वेळी डॉक्टर वेळेवर उपलब्ध न होणे, अॅम्ब्युलेन्स सेवेला झालेला विलंब किंवा रुग्णाला हा त्रास ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी या गोष्टी सहसा उपलब्धच नसणे अशा काही अडचणी या वेळेला येऊ शकतात.
अशा वेळी या सर्व गोष्टींची सोय होईपर्यंत तुम्ही तुमचा बीपी कमी म्हणजे योग्य आणि नियंत्रित प्रमाणात आणण्यासाठी काही प्रयत्न करू शकता.
या परिस्थितिमध्ये दीर्घश्वास घेत राहणे हे तुमच्या हिताचे ठरू शकते. अचानक बीपी वाढला हे निष्पन्न झाल्यावर वैद्यकीय मदतीची सोय होईपर्यंत तुम्ही दीर्घश्वास घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामुळे तुमच्या शरीरात तुमचा वाढलेला बीपी नियंत्रणात आणण्यासाठीच्या हालचालींची सुरुवात होते. या विषयी थोडी अजून सविस्तर माहिती बघूया.
- दीर्घश्वास घ्यायला लागल्यानंतर तुमचे शरीरी रीलॅक्स स्टेट मध्ये जाते. या रीलॅक्स स्टेट मध्ये तुमच्या शरीरात Gamma-Aminobutyric Acid (GABA) हॉरमोन secrete होतात. हे हॉरमोन पुढे तुमच्या ह्रदयाची गती आणि रक्तदाब कमी करण्यासाठी परिस्थिति निर्माण करतात.
- या रीलॅक्स स्टेट मध्ये अजून एक महत्वाचा बदल होतो. या रीलॅक्स स्टेट मध्ये तुमच्या शरीरात नायट्रिक ऑक्साइड (nitric oxide) तयार होते. हे नायट्रिक ऑक्साइड रक्तवाहिन्यांना रीलॅक्स करून त्यांना dilate करते. यामुळे रक्तवाहिन्यांमधील दाब म्हणजेच रक्तदाब कमी होण्यास सुरुवात होते.
- या रीलॅक्स स्टेट मध्ये तुमच्यामधील स्ट्रेस हॉरमोन जसे कोर्टिसोल (cortisol) ची पातळी कमी होण्यास मदत होते. यामुळे तुमची पूर्ण रक्तवह संस्था रीलॅक्स होते.
हे सर्व परिणाम तुमचा रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे अचानक बीपी वाढल्यावर काही मिनीटे दीर्घश्वास घेण्याचा सराव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
३. खाली सरळ झोपा
अचानक बीपी वाढल्यावर तुम्ही खाली सरळ झोपा. यामुळे तुमचे शरीर पूर्णपणे रीलॅक्स होईल आणि त्या अनुषंगाने मी वर सांगितलेले बदल तुमच्या शरीरात होण्यास सुरुवात होईल.
याव्यतिरिक्त खाली सरळ झोपल्यास एक वेगळी पॉस्चर निर्माण होते, ज्या पॉस्चर मध्ये तुमच्या शरीरात काही बदल व्हायला लागतात.
- सरळ झोपल्यास तुमच्या शरीरावर गुरुत्वाकर्षण चा प्रभाव कमी होते. ज्यामुळे तुमच्या ह्रदयाला संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा करण्यास सुलभता येते. यामुळे तुमच्या ह्रदयाचे काम कमी होऊन रक्तदाब देखील कमी होण्यास मदत होते.
- तुम्ही झोपलेल्या स्थितिमध्ये तुमच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढतो. यामुळे मेंदुमधील रक्तदाब नियंत्रित करणारे केंद्र योग्य पद्धतीने काम करायला लागते.
- तुम्ही उभे असलेल्या स्थितिमध्ये रक्ताला शरीरभर वाहण्यास बराच प्रतिकार (resistance) निर्माण होत असतो. यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब वाढतो. झोपलेल्या स्थितिमध्ये हा प्रतिकार कमी होऊन रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
हे काही बदल तुमचा रक्तदाब कमी करण्यास हातभार लावत असतात.
संबंधित वाचा – रक्तदाब कमी करण्याचे उपाय
४. गरम पाण्याने अंघोळ किंवा शॉवर
बीपी अचानक वाढल्यावर त्या व्यक्तीला गरम पाण्याने अंघोळ किंवा शॉवर घालणे उपयुक्त ठरू शकते. कदाचित अशा परिस्थिति मध्ये अंघोल वगैरे घालणे सोयीस्कर वाटणार नाही. अशा वेळेला मग गरम पाण्याने कापड ओला करून त्या व्यक्तीचे शरीर पुसले तरी देखील काहीसा फरक जाणवेल.
- या गरम पाण्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या dilate होण्यास सुरुवात होते. यामुळे रक्तदाब कमी होण्यास सुरुवात होते.
- गरम पाण्याच्या उर्जेमुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढण्यास उत्तेजना मिळते. आपण जसे मालीश करतो, त्यावेळेला जसा रक्तपुरवठा वाढतो, हे ही तसेच आहे.
- गरम पाणी शरीराला रीलॅक्स करते. यामुळे कोर्टिसोल हॉरमोन ची निर्मिती थांबते ज्यामुळे त्यानंतरचे होणारे बदल रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
वरील गरम पाण्याचे फायदे हे तुमचा वाढलेला बीपी कमी करण्यास मदत करू शकतात.
५. पाणी प्या
डीहायड्रेशन किंवा तुमच्या शरीरात कमी पाणी असणे हे तुमचा रक्तदाब वाढवू शकते. तुमच्या शरीरात कमी पाणी हे रक्ताचे प्रमाण (volume) सुद्धा कमी करते. त्यामुळे ह्रदयाला आहे तेवढ्या रक्ताच्या प्रमाणात संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह करावा लागतो. यामुळे ह्रदयावर अतिरिक्त ताण पडतो ज्यामुळे रक्तदाब वाढण्याची स्थिति निर्माण होते.
अशा परिस्थिति मध्ये पाणी घेतल्यावर तुमच्या रक्ताचे प्रमाण (volume) वाढून रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
- तसेच शरीरात वाढलेले रक्ताचे प्रमाण हे रक्ताला घट्ट होण्यापासून थांबवते. यामुळे रक्तदाब आपोआपच कमी व्हायला लागतो.
- शरीरात असलेले पुरेसे पाणी हे तुमच्या किडनी चे कार्य सुधारू शकते. यामुळे किडनी रक्तातील सोडियम कमी करून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
वरील सर्व बदलांना अनुसरून तुमच्या शरीरात रक्तवाहिन्यांवरील अतिरिक्त वाढलेला दाब कमी होण्यास मदत होते ज्यामुळे तुमचा वाढलेला बीपी सुद्धा कमी व्हायला लागतो.
शेवट
शेवटी अचानक वाढलेला रक्तदाब किंवा या प्रकारची हायपरटेन्सिव्ह क्राईसीस परिस्थिति घरी हातळण्याऐवढी सोपी नक्कीच नाही. यासाठी तुम्हाला वैद्यकीय हस्तक्षेप नक्कीच लागणार आहे. तरी पण वैज्ञानिक दृष्ट्या योग्य असलेले मी सांगितलेले काही घरगुती उपाय हे काही वेळ वाढलेल्या बीपी चे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात.
गरम पाण्याचा उपयोग, झोपणे, पाणी पिणे आणि दीर्घश्वास घेणे यामुळे तुमच्या शरीरात होणारे बदल वाढलेला बीपी कमी करण्यास मदत करू शकतात. या सर्व उपायांमुळे शरीरात व्हॅसोडिलेशन, स्ट्रैस हॉरमोन कमी करणे, मज्जा संस्था अॅक्टिवेट करणे हे सर्व बीपी कमी करणारे अनुकूल बदल होतात. या सर्व बदलांमुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास परिस्थिति निर्माण होते.
जर या विषयी मी दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद.
टीप: हा फक्त सल्ला समजावा, वरील मजकूर वाचून तुमचा चालू असलेला उपचार किंवा वैद्यकीय सल्ला बदलू नये.
FAQ’s
बीपी वाढल्यावर काय त्रास होतो ?
बीपी वाढल्यावर छाती मध्ये दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उलटी, मुंग्या येणे, डोकेदुखी हे त्रास होतात.
बीपी वाढल्यावर काय खावे ?
बीपी वाढल्यावर हिरव्या पालेभाज्या, विविध प्रकारचे फळे, धान्य आणि भरपूर पाणी प्यावे.
रक्तदाब अचानक वाढण्याचे कारण काय आहे ?
रक्तदाब अचानक वाढण्याचे अनेक कारणे ठरू शकतात. विविध किडनी चे आजार, मणक्याला दुखापत होणे, डॉक्टरांनी सूचित केलेली रक्तदाब ची गोली चुकवणे किंवा डोस चुकवणे, गर्भधारणेदरम्यान बीपी वाढणे या सर्व परिस्थिति मध्ये तुमचा बीपी अचानक वाढू शकतो.
निरोगी रक्तदाब म्हणजे काय ?
निरोगी रक्तदाब मंजे जेव्हा तुमचा बीपी हा ११०/७० ते १२०/८० दरम्यान च्या पातळी मध्ये असतो.
बीपी वाढल्यावर काय होते ?
बीपी वाढल्यावर तुमचे ह्रदय, रक्तवाहिन्या आणि इतर अवयवांवर वरील ताण वाढतो ज्यामुळे त्यांचे कार्य बिघडते.
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Certified Nutritionist.
Experienced Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747