वजन कमी करण्यासाठी किती कॅलरी कमी करावी लागते ? क्षणात सोप्या पद्धतीने समजून घ्या !

वजन कमी जास्त करत असताना कॅलरी हा घटक खूप महत्वाचा ठरत असतो. त्यातली त्यात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कॅलरी विषयी तर मूलभूत माहिती असणे आवश्यकच आहे.

Contents

तुम्ही वजन कमी करत असाल तर नक्कीच कॅलरी हा घटक लक्षात घेऊनच ते करत असाल ही अपेक्षा करतो. पण हे सर्व करून ही तुमचे वजन कमी होत नसेल तर तुमचे काही तरी नक्कीच चुकत असेल.

तुमचे कदाचित कॅलरीज चे गणित चुकत असेल. कारण वजन कमी करत असताना कॅलरी हा खूप गुंतागुंतीच्या विषय ठरतो. चांगल्या एक्स्पर्ट लोकांना सुद्धा किती कॅलरीज खाव्या किंवा कमी कराव्या हे कळत नाही.

म्हणून त्यात महत्वाचा विषय ठरतो की वजन कमी करण्यासाठी किती कॅलरी कमी करावी लागते ?

वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज किती कॅलरी जाळल्या पाहिजेत हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे.

उदाहरणार्थ, तुमच्याकडे एक गाडी आहे. त्या गाडीचे मायलेज हे त्या गाडीचे वजन, इंजिनची क्षमता, आणि तुम्ही कसा ड्रायव्हिंग करता यावर अवलंबून असणार आहे. वजन कमी करण्यासाठी लागणाऱ्या कॅलरींचं गणितही असंच आहे.

त्यातली त्यात तुमचं शरीर जेवढं स्मार्ट आहे तेवढच ते गुंतगुंतीचं सुद्धा आहे. कारण तुम्ही समजा जर x प्रमाणात कॅलरी कमी केल्या तर तुमचं शरीर कामासाठी लागणाऱ्या कॅलरीज कुठून घेईल आणि कसे घेईल हे पूर्णपणे शरीर ठरवत असते.

या ब्लॉग मध्ये तुम्हाला वजन कमी करण्यासाठी रोज किती कॅलरी कमी करावी लागतात याबद्दलचे स्पष्टीकरण आणि या संबंधित येणाऱ्या कॅलरी डेफीसीट, बेसल मेटबॉलिक रेट, मेंटेनन्स कॅलरीज आणि इतर संकल्पनांची माहिती मिळणार आहे.

चला तर मग वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नेमक्या किती कॅलरीज कमी कराव्या लागतील याचे उत्तर शोधूया.

कॅलरी म्हणजे काय ?

तुम्हाला वजन कमी करण्यासाठी किती कॅलरी कमी करावी लागते हे समजून घेण्यासाठी जे सर्वात अगोदर समजून घ्यावं लागणार आहे ते म्हणजे नेमके कॅलरी म्हणजे काय.

सर्वात अगोदर तर लक्षात ठेवा की कॅलरी ही कुठलीही वस्तु किंवा भौतिक गोष्ट नाहीये.

कॅलरी हे तुम्ही खात असलेले अन्न पदार्थ आणि पित असलेले पेय यांच्यामध्ये असलेल्या ऊर्जेचे मापक आहे. म्हणजे त्याविशिष्ट अन्न पदार्थ किंवा पेय मध्ये किती ऊर्जा आहे हे सांगण्यासाठी कॅलरी या मापक चा उपयोग केला जातो.

उदाहरणार्थ, एखादी गाडी आहे, ती गाडी चालवण्यासाठी पेट्रोल किंवा डीजेल च्या स्वरूपात इंधन लागत असते. पण तुम्हाला गाडी किती दूर आणि कशी चालवायची यावर तुम्ही त्यात किती इंधन टाकणार आहात हे अवलंबून असतं. त्यानुसार तुम्ही त्यात लिटर प्रमाणे इंधन टाकू शकता.

तसंच कॅलरी च्या बाबतीत सुद्धा आहे. तुम्ही खात असलेलं अन्न म्हणजे इंधन आणि त्या अन्नात जेवढी ऊर्जा आहे ते म्हणजे तुम्ही इंधन किती टाकले याचे प्रमाण.

तुमच्या शरीराच्या महत्वाच्या क्रिया जशा की श्वास घेणे, चालणे, बोलणे, व्यायाम या पार पाडण्यासाठी तुम्हाला या अन्नातून ऊर्जा लागत असते.

अन्नातील ही ऊर्जा कुठे असते ?

तुमच्या शरीराला लागणारी ही ऊर्जा तुम्हाला अन्नातून मिळते म्हणजे काय नेमके कुठून मिळत असते ?

ही ऊर्जा अन्नातील पोषक घटकांमध्ये असते. पोषक घटक जसे की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन (प्रथिने), आणि फॅट्स.

उदाहरणार्थ,

  • 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट = 4 कॅलरी
  • 1 ग्रॅम प्रोटीन = 4 कॅलरी
  • 1 ग्रॅम फॅट = 9 कॅलरी

यासाठी केळी चे उदाहरण घेऊया.

एक माध्यम आकार आणि वजनाच्या केळी पासून जवळपास १०० ते १२० एवढ्या कॅलरीज आपल्याला मिळत असतात. दूसरा अर्थ असा की १०० ते १२० कॅलरीज एवढी ऊर्जा एक केळी मध्ये असते.

अर्थातच, केळी चे वजन आणि आकार यानुसार त्यामधील असणाऱ्या कॅलरीज सुद्धा कमी जास्त होत असतात.

संबंधित वाचा- वजन कमी करण्यासाठी रात्रीचा आहार कसा असावा ?


बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) 

वजन कमी करण्यासाठी किती कॅलरी कमी करावी लागते यासाठी बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजेच BMR काय असते हे ही समजून घ्यावे लागेल. कारण वजन कमी करण्यासाठी किती कॅलरी कमी कराव्या लागतील हे ठरवण्यासाठी तुमचा BMR किती आहे हे लक्षात घ्यावा लागते.

तुम्हाला २४ तास फक्त जिवंत ठेवण्यासाठी जेवढ्या कॅलरीज लागतात त्या कॅलरी चे प्रमाण म्हणजेच तो तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट. मराठी भाषेत याला चयापचय दर असा शब्दप्रयोग आहे.

दुसऱ्या शब्दांत असं की तुम्ही २४ तास काहीही हालचाल न करता तुमच्या फक्त महत्वाच्या जैविक प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी लागणाऱ्या कॅलरीज म्हणजेच बेसल मेटाबॉलिक रेट.

आता इथे महत्वाच्या तुमच्या जैविक प्रक्रिया म्हणजेच तुमचं हृदय धडधडणं, फुफ्फुसांमधून श्वास घेणं, मेंदूचं कार्य, पचनप्रक्रिया आणि शरीरातील पेशी दुरुस्त करणे.

तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट कसा मोजायचा ?

प्रत्येकाचा बेसल मेटाबॉलिक रेट हा वेगळा असतो. हे त्या व्यक्तीचे वजन, ऊंची, लिंग आणि जीवनशैली कशी आहे यावर अवलंबून आहे. तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट मोजण्यासाठी तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता.

मी BMR मोजण्यासाठी हॅरिस-बेनेडिक्ट फॉर्म्युला अचूक समजतो. आणि सर्वसामान्य हाच वापरला जातो. म्हणून उदाहरण म्हणून तुमचा BMR मोजण्यासाठी खालच्या हॅरिस-बेनेडिक्ट समीकरणा चा उपयोग मी तुम्हाला सुचवेल.

पुरुषांसाठी:
BMR = 88.362 + (13.397 × वजन किलोग्रॅममध्ये) + (4.799 × उंची सेंटीमीटरमध्ये) - (5.677 × वय वर्षांमध्ये)

स्त्रियांसाठी:
BMR = 447.593 + (9.247 × वजन किलोग्रॅममध्ये) + (3.098 × उंची सेंटीमीटरमध्ये) - (4.330 × वय वर्षांमध्ये)

टोटल डेलि एनर्जि एक्स्पेंडीचर- (total daily energy expenditure-TDEE)

दूसरा जो घटक ज्याच गरज पडणार आहे तो आहे टोटल डेलि एनर्जि एक्स्पेंडीचर. त्याला आपण यापुढे TDEE म्हणून संबोधणार आहोत.

तुमची एका दिवसात खर्ची होणारी ऊर्जा किंवा तुम्हाला एका दिवसात लागणाऱ्या कॅलरीज म्हणजेच तो तुमचा TDE. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर तुम्ही दिवसभरात जे काही करता त्यासाठी लागणाऱ्या कॅलरीज आणि तुमचा BMR हे दोन्ही मिळून जेवढ्या कॅलरीज होतात तो तुमचा टोटल डेलि एनर्जि एक्स्पेंडीचर.

TDEE म्हणजेच टोटल डेलि एनर्जि एक्स्पेंडीचर हा घटक तुमच्या जीवनशैली नुसार तुम्हाला किती कॅलरीज लागतात हे सांगत असतो. त्यामुळे BMR सारखंच TDEE सुद्धा प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो.

एखाद्या व्यक्तीचा TDEE हा त्याचा BMR आणि इतर तीन घटकांनी मिळून ठरत असतो. एकूण TDEE हा चार घटकांनी बनतो. त्याची माहिती आपण खाली बघूयात.

VAJAN KAMI KARNYASATHI TDEE MOJA

१. BMR

BMR मध्ये तुम्ही काहीही हालचाल न करता २४ तास लागणाऱ्या कॅलरीज मोजल्या जातात.

२. थर्मिक इफेक्ट ऑफ फूड (thermic effect of food -TEF)

तुम्ही जे अन्न खाता, ते पचवण्यासाठी शरीराला काही कॅलरीज ची गरज पडत असते. जसं की प्रोटीन, फॅट्स, आणि कार्बोहायड्रेट्स यांचे विघटन म्हणजे पचन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रमाणात कॅलरीज लागत असतात. प्रोटीनसाठी सर्वाधिक कॅलरीज लागतात.

३. एक्सरसाईज अ‍ॅक्टिव्हिटी थर्मोजेनिसिस (exercise activity thermogenesis – EAT)

तुम्ही जर रोज नियमित पणे व्यायाम करत असाल तर त्यासाठी सुद्धा काही प्रमाणात कॅलरीज लागतातच. म्हणूनच TDEE मोजत असताना या कॅलरीज सुद्धा लक्षात घ्याव्या लागतात.

४. नॉन-एक्सरसाईज अ‍ॅक्टिव्हिटी थर्मोजेनिसिस (non-exercise activity thermogenesis – NEAT)

व्यायाम सोडून तुम्ही दिवसभरात ज्या हालचाली करता त्यासाठी काही प्रमाणात कॅलरीज खर्ची पडतात. त्याला नॉन-एक्सरसाईज अ‍ॅक्टिव्हिटी थर्मोजेनिसिस म्हणतात.

दाहरणार्थ, घरकाम करणे, झाडून घेणे, भांडी घासणे यासारख्या छोट्या हालचालींना लागणाऱ्या कॅलरीज. या कॅलरीज चा विचार सुद्धा तुमच्या TDEE मध्ये करावा लागतो.

या मध्ये तुम्ही जर विचार केला तर तुम्ही दिवसभरात जेवढ्या हालचाली करता त्या सर्वच प्रकारच्या हालचालींमधून लागणाऱ्या कॅलरीज विचार TDEE मोजण्या साठी केला जातो.

थोडक्यात काय तर TDEE हे तुमचं “कॅलरी बजेट” आहे.

तुमचा TDEE कसा मोजायचा ?

तुमचा TDEE मोजण्यासाठी खालची पद्धत वापरा.

STEP 1- दिलेल्या फॉर्म्युला नुसार तुम्ही तुमचा BMR काढून घ्या.

STEP 2- तुमची लाइफस्टाईल निवडा.


TDEE मोजण्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनशैलीनुसार एक नंबर (अ‍ॅक्टिव्हिटी फॅक्टर) निवडला जातो. त्यासाठी तुम्ही तुमच्या लाइफस्टाईल नुसार खालचा एक नंबर निवडा.

Sedentary (थोडीफार हालचाल, व्यायाम जवळपास नाही; डेस्कवर काम करणारे)-1.2

Lightly Active (हलका व्यायाम, आठवड्यातून 1-3 दिवस)- 1.375

Moderately Active (मध्यम व्यायाम, आठवड्यातून 3-5 दिवस)- 1.55

Very Active (तीव्र व्यायाम, आठवड्यातून 6-7 दिवस)- 1.725

Extremely Active (अत्यंत मेहनतीचा व्यायाम, खूप कठीण शारीरिक काम; दिवसातून 2 वेळा ट्रेनिंग)- 1.9

STEP 3- गुणाकार करा.

शेवटी तुमचा वरती आलेला BMR आणि दुसऱ्या स्टेप मध्ये तुमच्या लाइफस्टाईल नुसार निवडलेला नंबर यांचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार करून जे उत्तर येईल तो तुमचा TDEE.


तुम्हाला समजण्यासाठी एक उदाहरण बघूयात.

एका ३० वर्षांचा तरुण आहे ज्याचे वजन हे ६० किलो आणि ऊंची १६० सेंमी आहे. तो रोज थोड्याफार रोजच्या हालचाली आणि ऑफिस मध्ये डेस्क वर बसून काम करतो. त्या व्यक्तीचा TDEE काढूयात.

हॅरिस-बेनेडिक्ट फॉर्म्युला नुसार,

88.362 + (13.397 × वजन किलोग्रॅममध्ये) + (4.799 × उंची सेंटीमीटरमध्ये) - (5.677 × वय वर्षांमध्ये)

88.362 + (13.397 × 60) + (4.799 × 160) - (5.677 × 30)

BMR = 1489.

TDEE च्या फॉर्म्युला नुसार,

BMR × लाइफस्टाईल नंबर

1489 × 1.2 = 1786.

सादर व्यक्तीचा TDEE हा 1786 असेल.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा TDEE म्हणजे तुम्हाला दिवसभरात किती कॅलरीज ची आवश्यकता आहे याचे प्रमाण काढू शकता.

तुम्हाला वजन कमी करण्यासाठी किती कॅलरी कमी करावी लागते ?

वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज च्या किती कॅलरीज कमी केल्या पाहिजे या महत्वाच्या विषयाकडे आता आपण वळत आहोत. आतापर्यंत आपण या अनुषंगाने काही महत्वाच्या संकल्पना समजून घेतल्या.

तुमचा BMR, TDEE हे दोन मुद्दे कसे तुम्हाला कामी येणार आहेत ते तुम्हाला पुढे हळू हळू कळणार आहे.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही किती कॅलरीज कमी केल्या पाहिजेत याचे साधे आणि सरळ उत्तर असे आहे की तुमच्या शरीराला जेवढ्या कॅलरीज लागतात त्यापेक्षा कमी कॅलरीज तुम्हाला घ्याव्या लागतील.आणि उरलेल्या कॅलरीज कमी करायच्या.

हे सर्व समजून घेण्यासाठी अगोदर तुम्ही किती कॅलरीज घेतल्या पाहिजे हे समजून घ्या.

तुम्ही किती कॅलरीज घेतल्या पाहिजे यासाठी तुम्हाला कॅलरी डेफीसीट चा आधार घ्यावा लागेल. त्यापूर्वी कॅलरी डेफीसीट म्हणजे काय आणि ते कसे साध्य करावे हे तुम्हाला जाणून घ्यावे लागेल.

कॅलरी डेफीसीट म्हणजे काय ?

कॅलरी डेफीसीट हे एक अशी स्थिति आहे ज्यामध्ये तुम्ही शरीराला आवश्यक असलेल्या कॅलोरीपेक्षा कमी कॅलरीज सेवन करता.

तुम्ही तुमच्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी, काम करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा खाललेल्या अन्नातून कॅलरीज च्या माध्यमातून मिळवता. पण काय होईल जेव्हा तुम्ही लागणाऱ्या कॅलरीज पेक्षा कमी जेवलात किंवा कमी कॅलरीज सेवन केल्या ?

अशा वेळी शरीर तुमच्या शरीरात जिथे फॅट जमा झाले आहे अशा जागेवरून फॅट काढून तेथील कॅलरीज चा उपयोग उर्जेसाठी करण्याचा प्रयत्न करेल.

असं करून हळू हळू तुमच्या शरीरातील फॅट कमी व्हायला लागते, परिणामी तमचे वजन सुद्धा कमी व्हायला लागते.

कॅलरी डेफीसीट कसे ठरवावे ?

वजन कमी करण्यासाठी किती कॅलरी कमी करावी लागते

कॅलरी डेफिसिट ठरवण्यापूर्वी तुमच्या शरीराला प्रत्यक्षात किती कॅलरीची गरज आहे, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे.

कारण अत्यंत कमी कॅलरीज करून तुमच्या शरीरात उर्जे ची कमतरता होऊन शरीराला नुकसान होणार याची खबरदारी सुद्धा घ्यावी लागते आणि तुमचं वजन कमी करण्याचं उद्देश साध्य होईल याचा सुद्धा विचार करावा लागतो.

म्हणून किती कॅलरीज ची तूट म्हणजे डेफीसीट निर्माण करायची हे ठरवण्यासाठी तुम्हाला दिवसभरात किती कॅलरीज लागतात हे शोधणं तुमची पहिली पायरी आहे.

इथे तुम्हाला TDEE कामी येणार आहे. तुमचा TDEE काढून तुम्ही तुम्हाला दिवसभरात किती कॅलरीज ची आवश्यकता असते हे शोधू शकता.

एकदा की तुम्ही तुमचा TDEE काढला, तर त्या TDEE पेक्षा कमी कॅलरीज तुम्हाला घ्यायच्या आहेत असं समजा.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही किती कॅलरीज डेफीसीट ठेवलं पाहिजे ?

हे सर्व वाचल्यानंतर तुम्हाला शेवटी प्रश्न पडेल की मग किती प्रमाणात कॅलरी डेफीसीट करावे. आणि इथेच तुमचा खरा प्रश्न उभा राहतो की वजन कमी करण्यासाठी किती कॅलरी कमी कराव्या.

खऱ्या अर्थाने हा ब्लॉग आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या टप्प्यावर आला आहे. पण या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी किंवा ते तुम्हाला समजण्यासाठी इथपर्यंत येणे महत्वाचे होते आणि या अगोदर च्या गोष्टी समजावून सांगणे सुद्धा महत्वाचं होत.

अनेक अभ्यासात प्रत्येक दिवस 500 कॅलरीज चे कॅलरी डेफीसीट हे प्रभावी आणि सुरक्षित मानले आहे. त्यामुळे तुम्ही 500 च्या वर कॅलरी डेफीसीट ठेवू नका असं मी सुचवेल. म्हणजे तुम्हाला दिवसभरात लागणाऱ्या कॅलरीज पेक्षा फक्त 500 कॅलरीज कमी सेवन करा किंवा 500 अधिक कॅलरीज बर्न होतील एवढा व्यायाम किंवा शारीरिक हालचाली करा.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही किती कॅलरीज डेफीसीट ठेवलं पाहिजे

या 500 च्या कॅलरी डेफीसीट मध्ये तुमचे आठवड्याला 0.5 म्हणजे अर्धा किलो वजन कमी होते. म्हणजे जर तुम्ही महिनाभर 500 चे कॅलरी डेफीसीट ठेवले तर एक महिन्यात तुमचे 2 किलो वजन कमी होणार आहे. हे खूपच सुरक्षित आणि टिकावू आहे.

500 चे कॅलरी डेफीसीट ठेवणे हे निरोगी आणि सुरक्षित पद्धतीने वजन कमी करण्यासाठी एक योग्य प्रमाण आहे. इतर पद्धतीने जसे की उपाशी राहून किंवा झटपट पद्धतीने वजन करून शरीरात होणारी उर्जे ची कमतरता किंवा इतर दुष्परिणाम होतात ते 500 चे कॅलरी डेफीसीट मध्ये होत नाही.

जास्त प्रमाणात कॅलरी डेफीसीट केल्यावर काय होईल ?

कॅलरी डेफीसीट हे स्थिति तुमच्यासाठी नुकसान कारक ठरू शकते. कारण तुमचे शरीर जास्त वेळ लो एनर्जि स्टेट मध्ये राहू शकत नाही. अशा वेळी शरीर उर्जेचे इतर मार्ग शोधत असते. आणि हे तुमच्या शरीरासाठी चांगले नक्कीच नाही. याचे कारण खाली बघूयात.

समजा एका व्यक्तीला रोज 2000 कॅलरी लागतात. वजन कमी करण्यासाठी ती व्यक्ति 1500 कॅलरी घेत असेल आणि तर 500 कॅलरीचा डेफीसीट निर्माण करतो.

त्या व्यक्तीने हे कॅलरी डेफीसीट सतत 2-3 महीने चालू ठेवले. त्यात त्याचे वजन नक्कीच कमी व्हायला मदत मिळणार आहे.

पण समजा जर त्या व्यक्तीने 500 चं कॅलरी डेफीसीट न ठेवता 500 पेक्षा जास्त, 800 किंवा 100 कॅलरीज चं डेफीसीट ठेवलं, तर अशा वेळी काय होईल ?

अर्थातच त्या व्यक्तीच्या शरीरात अधिक प्रमाणात कॅलरीज ची तूट म्हणजे कमतरता निर्माण होईल. यामुळे शरीर हळू हळू survival मोड मध्ये जाईल. तुमचं शरीर आता जिथून मिळेल तिथून ऊर्जा घेण्याचा प्रयत्न करेल. यामुळे तुम्हाला खालील गोष्टींना सामोरे जावं लागू शकत.

  • थकवा आणि कमजोरी: शरीराला पुरेशी ऊर्जा न मिळाल्यामुळे त्या व्यक्तीला सतत थकवा जाणवेल.
  • मेटाबॉलिजम कमी होणे: फार कमी कॅलरीमुळे शरीराचा मेटाबॉलिजम सुद्धा स्लो (कमी) होतो, ज्यामुळे वजन कमी होण्याचा वेग थांबतो. काही वेळा उलट वजन वाढण्याची शक्यता असते.
  • पोषक घटकांची कमतरता: कॅलरीसोबतच प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे यांचीही कमतरता होते, ज्यामुळे केस गळणे, त्वचेची समस्या, हाडांचा ठिसुळपणा ही लक्षणे जाणवू शकतात.
  • मूड स्विंग्स आणि तणाव: पुरेसं अन्न सेवन न केल्यामुळे मेंदूला आवश्यक ग्लुकोज मिळत नाही, ज्यामुळे चिडचिडपणा आणि तणाव वाढू शकतो.

कॅलरी डेफीसीट कस साधता येईल ?

कॅलरी डेफीसीट तर तुम्हाला कळले असेल पण ते कस साध्य करायचं ?

1. कमी कॅलरी चा आहार घ्या (लो कॅलरी डायट)

कॅलरी कमी करण्यासाठी तुमच्या आहारात कमी कॅलरी असलेल्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे आपो आपच तुमच्या शरीरात कमी कॅलरीज जातील ज्यामुळे कॅलरी डेफीसीट ची स्थिति निर्माण होईल. यासाठी फळे, भाज्या, प्रोटीन आणि संपूर्ण धान्य हे चांगले पर्याय आहेत.

2. व्यायाम

जास्त कॅलोरी खर्च करण्यासाठी नियमित व्यायाम करा, नियमित शारीरिक हालचाली करा. जेवढ्या जास्त शारीरिक हालचाल करताल तेवढ्या तुमच्या कॅलरीज बर्न होतील.

3. कमी कॅलरी चा आहार आणि व्यायाम

कमी कॅलरी आहार आणि व्यायाम दोन्ही गोष्टी अवलंबून तुम्ही चांगल्या प्रमाणात कॅलरीज बर्न करू शकता.

वरच्या तीन मार्गांनी तुम्ही कॅलरी डेफीसीट ची स्थिति निर्माण करू शकता. या बाबतीत एक महत्वाचं आहे की तुमच्या शरीरात कॅलरी डेफीसीट ची स्थिति निर्माण झाली पाहिजे.

मग ती तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. तुम्हाला आवश्यक असणाऱ्या कॅलरीज पेक्षा कमी कॅलरीज सेवन करा किंवा तुम्ही घेतलेल्या कॅलरी पेक्षा जास्त व्यायाम करून जास्त कॅलरी बर्न करू शकता.

कॅलरी डेफीसीट ही स्थिति तुमच्यासाठी नुकसान कारक ठरू शकते. कारण तुमचे शरीर जास्त वेळ लो एनर्जि स्टेट मध्ये राहू शकत नाही. अशा वेळी उर्जेचे मार्ग शोधत असते. पण हे तुमच्या शरीरासाठी चांगले नक्कीच नाही. याचे कारण खाली बघूयात.

संबंधित वाचा- वजन कमी करण्यासाठी काय खावं ?

संबंधित वाचा- वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करावा ?

सारांश

वजन कमी करत असताना तुम्ही खूपच टेक्निकल आणि प्रॅक्टिकल असावे लागतात. यात तुम्ही अंधारात तीर नाही मारू शकत. यासाठी तुम्हाला कॅलरी म्हणजे काय, BMR, TDEE म्हणजे काय हे समजून घेऊनच वजन कमी करण्याच्या प्रवासाला सुरुवात करावी लागते.

बरेच लोक झटपट वजन कमी करण्याच्या नादात अनेक वेगवेगळे प्रॅक्टिकळी शक्य नसणाऱ्या पद्धतींचा वापर करतात. जसं की फॅड डाएट्स किंवा जास्त प्रमाणात व्यायाम करणे,उपाशी राहणे.

खरं तर अशा गोष्टी जास्त काळ पुढे नेणे शक्य नाही. शिवाय अशा पद्धतींमुळे वजन तात्पुरते कमी होते, परिणाम काही दीर्घकाळ टिकत नाही.

त्यामुळे गरज आहे टिकावू आणि सुरक्षित पद्धतीने वजन करण्याची. आणि हे असं तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला शास्त्रीय दृष्टिकोनातून बघताल आणि त्यानुसार त्यात समाविष्ट असलेल्या संकल्पनांना अभ्यासून त्या पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात करताल.

वजन कमी करण्याच्या प्रवासात सर्वात महत्वाची संकल्पना आहे कॅलरी डेफिसिट ची. असं समजा की कॅलरी डेफिसिट तुमचं वजन कमी करण्यासाठीचा हा पाया आहे.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणतीही पद्धत, घरगुती उपाय, औषध किंवा कोणताही उपाय केला तरी कॅलरी डेफिसिट शिवाय तुमचं वजन कमी होणं शक्य नाही.

एका पद्धती मध्ये कॅलरी डेफिसिट शिवाय तुमची चरबी काढून तुमचं वजन कमी केलं जातं. ते म्हणजे बॅरिएट्रिक सर्जरी मध्ये. या मध्ये शस्त्रक्रिया करून तुमच्या शरीरात जिथे चरबी जमा झाली आहे, त्या ठिकाणाहून चरबी काढून तुमचे वजन कमी केले जाते. यावर आपण केवाह तरी बोलूया.

पुन्हा कॅलरी डेफिसिट कडे वळूयात.

कॅलरी डेफिसिट जेवढं वजन कमी करण्यासाठी महत्वाचं आहे तेवढंच त्याचा संतुलित आणि अभ्यासपूर्ण अवलंब करणे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जास्त प्रमाणात ठेवलेले कॅलरी डेफिसिट चे प्रमाण तुमच्या शरीरात कमी कमी ऊर्जा, अशक्तपणा, स्नायूं ची झीज होणे आणि इतर शारीरिक विकार उत्पन्न करू शकते.

त्यामुळे कॅलरी डेफिसिट अगदी योग्य आणि सुरक्षित प्रमाणात ठेवणं खूप महत्वाचं ठरते. यासाठी 500 कॅलरी ची तूट तुम्ही निश्चित करू शकता. हे प्रमाणं अगदी सुरक्षित आणि आणि प्रभावी आहे.

त्यामुळे तुमच्या वजन कमी करण्यासाठी किती कॅलरीज कमी कराव्या या प्रश्नाचे उत्तर सरळ सरळ होते 500 कॅलरीज. तरी यात इतर बऱ्याच गोष्टी अंतर्भूत असतात ज्या तुम्हाला कमी कराव्या लागणाऱ्या कॅलरीज वर फरक पडू शकतो.

पण साधारण पणे 500 कॅलरीज एवढे प्रमाण हे योग्य आणि उत्तम आहे.

कॅलरी डेफिसिट बरोबर अजून दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात ज्या कोणत्याही वजन कमी करण्याच्या पद्धतींना रीप्लेस करू शकत नाहीत.ते दोन घटक आहे पोषक आहार आणि तुमची झोप म्हणजेच रेस्ट.

या दोन गोष्टी तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सोपा आणि जलद करतात. आहारात फक्त प्रोटीन असून चालणार नाही तर फायबर्स, कार्ब आणि आवश्यक फॅट्स यांचा सुद्धा समावेश ठेवणे महत्त्वाचे आहे.

शेवटी या सर्व प्रक्रिये मध्ये आणि वरच्या सर्व घटकांवर प्रभाव करणाऱ्या दोन महत्वाच्या गोष्टी ठरतात. त्या आहेत शिस्त आणि सातत्य.

तुम्ही किती योग्य,अचूक डायट, रूटीन, तुमची जीवनशैली ठरवली पण त्यामध्ये शिस्त आणि सातत्य नसेल तर तुम्हाला पाहिजे तो परिणाम मिळणं खूप अवघड आहे.

मला वाटतं मी आता इथे थांबलं पाहिजे.

मी अपेक्षा करतो की माझ्या या ब्लॉग मध्ये तुम्हाला वजन कमी करण्यासाठी किती कॅलरीज कमी कराव्या याचे नक्कीच उत्तर मिळाले असेल.

शेवटी तुम्हाला तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला माझ्याकडून शुभेच्छा.

माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेन्ट करून नक्की कळवा.

धन्यवाद !

कॅलरी बर्न होणे म्हणजे काय?

कॅलरी बर्न होणे म्हणजे तुमचे शरीर काही तरी कामासाठी तुमच्या शरीरातील कॅलरीज चा वापर करणे. या कॅलरीज तुमच्या मूलभूत क्रिया जसे की श्वसन, हृदयाचे ठोके, पचन, आणि शारीरिक हालचाल करण्यासाठी लागतात.

शरीराचा कोणता भाग सर्वाधिक कॅलरी बर्न करतो?

स्नायू (मसल्स) हा शरीराचा तो भाग आहे जो सर्वाधिक कॅलरी बर्न करतो. स्नायू जास्त सक्रिय (अॅक्टिव) असतात आणि तुम्ही रेस्ट मध्ये असताना सुद्धा कॅलरी जास्त प्रमाणात वापरतात.

दिवसाच्या कोणत्या वेळी शरीर सर्वात जास्त कॅलरी बर्न करते?

कॅलरी बर्न ही प्रक्रिया दिवसभर चालू असते. किती कॅलरीज बर्न होतात हे पूर्णपणे तुमच्या दैनंदिन हालचाल, व्यायाम, आहार, वय, लिंग, ऊंची आणि तुमचे सध्याचे असलेले वजन यावर अवलंबून आहे

कोणत्या वयात सर्वाधिक कॅलरी बर्न करता?

किशोरवय (teens) आणि तरुण वयात (20s) शरीर सर्वाधिक कॅलरी बर्न करते. या वयात चयापचयाचा (मेटबॉलीजम) वेग जास्त असतो आणि शारीरिक हालचालीही अधिक असतात. वय वाढल्यावर चयापचय कमी होतो आणि कॅलरी बर्न होण्याचे प्रमाण घटते.

तुम्ही लहान असताना जास्त कॅलरी का बर्न करता?

लहान मुलांमध्ये शरीराचा विकास, स्नायू आणि हाडे तयार होणे यांसाठी ऊर्जेची जास्त गरज असते.त्यांचा मेटबॉलिक रेट ही जास्त असतो. त्याशिवाय, लहान मुलांची हालचाल आणि खेळण्याची सवय अधिक असल्यामुळे त्यांचे कॅलरी बर्न होण्याचे प्रमाण जास्त असते.

तुम्ही मोठे झाल्यावर जास्त कॅलरी बर्न करता का?

तुम्ही मोठे झाल्यावर जास्त कॅलरी बर्न होण्याचं प्रमाण कमी होतं. कारण त्या वेळेला तुमच्या चयापचयाचा वेग कमी होतो, स्नायूंचे प्रमाण कमी होते, आणि शारीरिक हालचाली सुद्धा कही प्रमाणात कमी होतात. पण नियमित व्यायाम, वेट ट्रेनिंग आणि संतुलित आहार यामुळे या वयातही जास्त कॅलरी बर्न होऊ शकतात, पण त्यासाठी अतिरिक्त प्रयत्न आवश्यक असतो.

Leave a Comment