युरिक ऍसिड वाढण्याची कारणे

युरिक ऍसिड वाढण्याची कारणे जाणून घेतल्यास तुम्हाला त्याविषयी योग्य मार्गदर्शन मिळून तुम्ही त्यानुसार योग्य आणि अचूक पावले उचलू शकणार आहात.

Contents

तुम्हाला कधी अचानक तुमच्या सांध्यांमध्ये भयंकर,सहन न होणाऱ्या अशा वेदना झाल्या आहेत का? विशेषतः तुमच्या मोठ्या बोटात? असं असेल, तर कदाचित तुमचं युरिक ॲसिड वाढलेलं असू शकतं. हो. तुमच्या रक्तातील युरिक ॲसिड वाढल्याचं ही लक्षण असू शकतं.

दुसरं, कल्पना करा की तुम्ही रात्री गाढ झोपेत असताना एकदम जागे होता आणि तुमच्या बोटात असह्य वेदना सुरू होतात.या वेदना कोणत्या कारणामुळे असू शकतात? याचे उत्तर ही याच साध्या युरिक ॲसिडमध्ये दडलेलं आहे.

हे जाणून बहुतेक तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे वाढलेलं युरिक ॲसिड आज अनेकांसाठी आणि कदाचित तुमच्यासाठी सुद्धा गाऊटसारख्या त्रासदायक संधिवात आजाराच प्रमुख कारण बनत आहे. अनेक सर्वे नुसार जगभरात या गौट आजाराचें, लोकसंख्येच्या ४ टक्के रुग्ण आढळतात. यात महिलांचे प्रमाण अधिक आढळते.

थोडक्यात सांगायचे तर युरिक ऍसिड हे सामान्यपणे सर्वांच्याच शरीरात यकृताद्वारे उत्पन्न होत असते. त्यानंतर प्रक्रियाद्वारे ते शरीराबाहेर सुद्धा पडते.

६५ ते ७५ टक्के युरिक ऍसिड हे किडनी मार्फत लगवी द्वारे शरीराबाहेर फेकले जाते तर. उर्वरित २५ ते ३५ टक्के युरीक ऍसिड हे आतड्यांद्वारे शरीराबाहेर उत्सर्जित केल्या जाते. त्यामुळे शरीरात युरीक ऍसिड चे प्रमाण हे नियंत्रित स्वरूपातच राहते.

पण खरंच, हे युरिक ॲसिड कसं वाढत आणि वाढण्याचं कारण काय आहे? फक्त आपण खात असलेल्या मांसाहारी पदार्थांमुळे किंवा दारूमुळे हे होतं का? की याच्या मागे मानसिक तणाव, अनुवंशिकता, किंवा आणखी काही विशिष्ट घटक असू शकतात ?

कारणे कोणतीही असोत. पण शरीरात वाढलेले हे युरीक ऍसिड अनेक आरोग्य समस्या निर्माण करत असते. यामधे विशेषकरून गाउट (Gout) नावाचा संधीरोग होतो.

गाउट (Gout) आजारामध्ये वाढलेले हे युरीक ऍसिड तुमच्या संधि च्या ठिकाणी जमा होऊन तिथे तीव्र वेदना आणि इतर लक्षणे निर्माण करतात.

शरीरात युरीक ऍसिड वाढण्याची कारणे अनेक आहेत. या पोस्टमध्ये आपण युरिक ॲसिड वाढण्याची कारणं सखोलपणे पाहणार आहोत, बहुतेक कारणे ही सामान्य आहेत. त्यामुळे ही कारणे समजल्यानंतर वाढलेले युरीक ऍसिड कमी होण्यास वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे देखील सोपे जाते.

पण काही कारणे हे गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे त्यासाठी वेगळा अप्रोच तुम्हाला घ्यावा लागू शकतो. तूर्तास आपण कारणे बघायला सुरुवात करुयात.

युरिक ऍसिड म्हणजे काय ?

युरिक ऍसिड हा आपल्या शरीरात तयार होणारा एक केमिकल पदार्थ आहे. प्युरीन (purine) या मुळ केमिकल पदार्थाचे विघटन होऊन त्यातून युरिक ऍसिड हा पदार्थ तयार होतो. युरिक ऍसिड हा पदार्थ निसर्गता लगवी द्वारे शरीराबाहेर फेकल्या जातो. पण काही कारणांमुळे तो शरीराबाहेर फेकल्या जात नाही. ज्यामुळे शरीरात काही ठिकाणी हे युरिक ऍसिड जमा होऊन तेथील आजार निर्माण करतो.

प्युरीन हा पदार्थ निसर्गत आपल्या शरीरात असतो. या व्यतिरिक्त काही आहार पदार्थ यामधून सुद्धा प्युरीन आपल्या शरीरात तयार होते. जसे की :

  • मांसाहार (विशेषकरून लाल चरबी, प्राण्यांचे काही अवयव, मासे)
  • सोयाबीन
  • कोबी
  • बीयर
  • पालक
  • मसूर डाल
  • राजमा
  • मशरूम

या आणि इतर पदार्थांमध्ये प्युरीन चे प्रमाण अधिक असते.

युरिक ऍसिड वाढण्याची लक्षणे (uric acid symptoms in marathi)

तुमच्या शरीरातील युरिक ऍसिड वाढल्यावर तुम्हाला काही लक्षणे, त्रास जाणवू शकतात. कारण वाढलेले हे युरिक ऍसिड तुमच्या शरीरात अनेक ठिकाणी जमा होऊन तेथी आजार आणि लक्षणे निर्माण करत असतात.

युरिक ऍसिड वाढल्यावर कोणते लक्षणे जाणवू शकतात याबद्दल थोडक्यात माहिती बघूया.

  • युरिक ऍसिड वाढलेल्या सर्वच व्यक्तींमध्ये त्याची लक्षणे जाणवतील असे नाही. काहींना ही लक्षणे किंवा इतर कोणतीच लक्षणे नाही जाणवू शकत. विशेषकरून जर वरीलपैकी कोणतेही कारण तुमच्यासाठी लागू नसेल तर लक्षणे जाणवतील याची शक्यता कमीच राहते.

युरिक ऍसिड जोइंटस च्या ठिकाणी जमा झाल्यास जाणवणारी लक्षणे

युरिक ऍसिड जोइंटस च्या ठिकाणी जमा झाल्यास

वाढलेले ही युरिक ऍसिड तुमच्या काही संधिच्या (joints) ठिकाणी जमा होते. विशेष करून छोट्या संधिच्या ठिकाणी हे जास्त आढळते. जसे की पायाचे बोट.

याबाबतीत खालील लक्षणे जाणवतात.

  • सांध्यामध्ये तीव्र वेदना
  • सांध्यामध्ये कडकपणा
  • सांधे हलविण्यात अडचण
  • लालसरपणा आणि सूज

युरिक ऍसिड किडनी मध्ये जमा झाल्यास

या व्यतिरिक्त किडनी मध्ये सुद्धा हे वाढलेले हे युरिक ऍसिड जमा होत राहते. यामुळे किडनी मध्ये urate नावाचे खडे तयार होतात. यावेळेस तुम्हाला किडनी संबंधित इतर लक्षणे देखील जाणवू शकतात.

युरिक ऍसिड किडनी मध्ये जमा झाल्यास

  • तुमच्या पाठीच्या खालच्या भागात, बाजूला, ओटीपोटात किंवा मांडीवर दुखणे
  • मळमळ
  • लघवी करण्याची तीव्र इच्छा होणे
  • लघवी करताना वेदना होणे
  • लघवी करण्यात अडचण
  • लगवीमधून रक्त पडणे
  • लगवीचा दुर्गंध येणे

नॉर्मल युरिक ऍसिड किती पाहिजे ? (uric acid normal range in marathi)

नॉर्मल युरिक ऍसिड किती पाहिजे हे जाणून घेण्यागोदर काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे.

  • प्रत्येक लॅब नुसार तुमची नॉर्मल युरिक ऍसिड ची वॅल्यू बदलू शकते.
  • यामुळे ब्लॉग मधील वॅल्यू बघून निदान करणे चुकीचे ठरेल. तुमचे रिजल्ट डॉक्टरांना दाखवूनच त्याचे अचूक निदान आणि योग्य उपचार करायचे आहे.

सामान्यता स्त्री आणि पुरुष दोन्ही मध्ये नॉर्मल युरिक ऍसिड ची वॅल्यू वेगळी आहे. नॉर्मल युरिक ऍसिड हे 3.5 ते 7 mg/dl एवढे असावे म्हणजे या दरम्यान असावे.

  • पुरुषांसाठी 7 mg/dl पेक्षा जास्त युरिक ऍसिड हे वाढलेले युरिक ऍसिड समजावे.
  • महिलांसाठी 6 mg/dl पेक्षा जास्त युरिक ऍसिड हे वाढलेले युरिक ऍसिड समजावे.

या ब्लॉग मध्ये आपण युरिक ऍसिड वाढण्याची कारणे बघणार आहोत. त्याच बरोबर युरीक ऍसिड वाढण्यासाठी काही घटक, तुमची जीवनशैली जी जबाबदार ठरू शकतात, याबद्दल सुद्धा सविस्तर अशी माहिती या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.

काय आहेत युरिक ऍसिड वाढण्याची कारणे

युरिक ऍसिड वाढण्याची कारणे अनेक असल्यामुळे त्या सर्व कारणांची व्यवस्थित मांडणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही सर्व कारणे त्यांच्या स्वभावानुसार विभागणी करून आपण बघणार आहोत.

१. कार्यात्मक कारणे (functional reasons)

शरीरातील युरिक ऍसिड आणि त्याचा शरीर अंतर्गत कार्य आणि प्रवास बघता, शरीरातील युरिक ऍसिड वाढण्यासाठी मूलभूत तीन कारणे महत्वाची ठरतात.

युरिक ऍसिड वाढण्याची 3 कारणे

  • प्युरीन युक्त अन्न पदार्थ: प्युरीन युक्त आहार जास्त घेतल्यास स्वाभाविक तुमच्या शरीरात त्या प्युरीन चे विघटन होऊन त्यातून अधिक प्रमाणात युरिक ऍसिड तयार होते.
  • शरीराकडून अधिक प्रमाणात युरिक ऍसिड चे उत्पादन: शरीराच्या काही कार्यांमध्ये बिघाड झाल्यावर शरीर जास्त आणि अतिरिक्त प्रमाणात युरिक ऍसिड बनवायला लागते. हे असे का होते याचे अचूक कारण अजून समजू शकलेले नाही.
  • यूरिक ऍसिडचे कमी उत्सर्जन: काही परिस्थितिमध्ये शरीराकडून जे यूरिक ऍसिड शरीराबाहेर फेकून देणे अपेक्षित आहे, ते शरीराबाहेर फेकल्या जात नाही. शरीरात युरिक ऍसिड वाढण्याच्या कारणांमध्ये हे कारणच मुख्यता जास्त आढळते.

प्युरीन युक्त अन्न पदार्थ

अनेक पदार्थांमध्ये प्युरीन्स नैसर्गिकरित्या आढळतात. जसे की मांसाहार, गोबी, सोयाबीन या पदार्थांमध्ये प्युरीन्स जास्त आढळते. त्यामुळे जास्त प्रमाणात या पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात प्युरीन्स चे प्रमाण वाढते.

पुढे या प्युरीन्स चे विघटन होऊन त्यातून यूरिक ऍसिड तयार होत असते.

सामान्य परिस्थिती मध्ये शरीर यूरिक ऍसिड उत्पादन आणि त्याचे शरीराबाहेर फेकण्याचे काम हे संतुलित प्रमाणात करत राहते. पण जेव्हा तुम्ही जास्त प्युरीन युक्त आहार घेता तेव्हा मात्र यूरिक ऍसिड शरीराबाहेर फेकण्यास समस्या निर्माण होते.

शरीराकडून अधिक प्रमाणात युरिक ऍसिड ची निर्मिती

शरीराच्या काही महत्वाच्या चयापचय प्रक्रिया बिघडल्यास शरीर अतिरिक्त प्रमाणात युरिक ऍसिड तयार करायला लागते.

तसेच काही आजारांमध्ये शरीराची युरिक ऍसिड तयार करण्याची क्षमता वाढते. जसे की :

  • लिम्फोमा (lymphoma)
  • रक्ताचा कर्करोग (leukemia)
  • हेमोलाइटिक अनेमिया (hemolytic anemia)
  • सोरायसिस (psoriasis)

वरील सर्व परिस्थिति किंवा आजारांमध्ये तुमच्या शरीराची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष युरिक ऍसिड तयार करण्याची क्षमता वाढते.

यूरिक ऍसिडचे कमी उत्सर्जन

यूरिक ऍसिडचे कमी उत्सर्जन म्हणजे शरीराची यूरिक ऍसिड बाहेर फेकण्याची क्षमता कमी होते. यामधे यूरिक ऍसिड बाहेर फेकण्यासाठीची यंत्रणा कमकुवत होते. किडनी यूरिक ऍसिड चे उत्सर्जन म्हणजे लगवी वाटे बाहेर फेकण्याचे काम करते.

त्यामुळे किडनी विषयी कोणतेही आजार, हे तुमच्या शरीरातील यूरिक ऍसिड बाहेर जाण्यापासून थांबवू शकतात. या आजारांमध्ये किडनी ची यूरिक ऍसिड चे उत्सर्जन करण्याची क्षमता कमी होते. यामुळे शरीरातील यूरिक ऍसिड हे बाहेर न पडता, शरीरातच काही ठिकाणी जमा होऊन तेथील आजार निर्माण करते.

या व्यतिरिक्त मी जे इतर कारणे सांगणार आहे, ती सर्व कारणे शरीरात वरील प्रमाणे बदल घडवतात आणि शरीरात यूरिक ऍसिड वाढवता.

संबंधित वाचा- युरीक अॅसिड कमी करण्याचे उपाय

२. औषधे

काही औषधांमुळे सुद्धा तुमच्या शरीरातील युरीक ऍसिड वाढत असते. तुम्ही जर तुमच्या आजारांसाठी काही औषधे घेत असाल तर ती औषधे तुमचे युरीक अॅसिड वाढवतात का याबद्दल तुम्ही खात्री करून घ्या.

विविध मार्गाने ही औषधे तुमच्या शरीरातील युरीक अॅसिड वाढण्यास मदत करत असते.

या मध्ये तुम्ही विशिष्ट प्रकारची काही औषधे घेत असाल तर ते तुमच्या युरीक ऍसिड चयापचय (metabolism) मध्ये व्यत्यय आणून आणि इतर बदल घडवून तुमच्या शरीरात युरीक ऍसिड साठवून ठेवतात.

यामध्ये विशिष्ठ औषधे जसे की :

  • मूत्रल औषधं (Diuretics)
  • क्षयरोगविरोधी औषधं – एथांब्युटॉल (Ethambutol), पायराझिनामाईड (Pyrazinamide)
  • रोगप्रतिकारक शक्ती दाबणारी औषधं – सायक्लोस्पोरिन (Ciclosporin), टॅक्रोलिमस (Tacrolimus)
  • निकोटिनिक ऍसिड (Nicotinic acid)
  • अ‍ॅस्पिरिन (Aspirin)
  • नॉन-ग्लुकोज कार्बोहायड्रेट्स – फ्रुक्टोज (Fructose), लॅक्टेट इन्फ्युजन (Lactate infusion)

वरील सर्व औषधे ही अनेक पद्धतीने तुमच्या शरीरातील युरीक ऍसिड वाढवतात.

3. बीयर

अल्कोहोल हा घटक प्युरिनचा चांगला स्त्रोत मानला जातो. त्यामुळे अल्कोहोल युक्त पदार्थ, विशेषकरून बीयर मूळे शरीरात युरीक अॅसिड चे प्रमाण वाढते. आता यामधे अल्कोहोल युक्त सर्वच पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात प्युरिन आढळते. पण प्युरिन चे सर्वाधिक जास्त प्रमाण हे बीयर मध्ये आढळत असल्याचे अनेक अभ्यासात सिद्ध झाले आहे.

संशोधनानुसार जास्त प्रमाणात केलेले मद्यपान हे दुपटीने gout या आजाराचा धोका वाढवते.

या बाबतीत दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ज्यांना अगोदर gout असल्याचे निदान झाले आहे, अशा लोकांनी बीयर सेवन केल्यास त्यांची gout ची लक्षणे अधिक तीव्र होतात. हे अनेक अभ्यासात देखील सिद्ध झाले आहे.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित या अभ्यासातील १४.१८ टक्के लोकांनी त्यांनी अल्कोहोल चे सेवन केल्यावर gout चे लक्षणे अधिक तीव्र होत असल्याचे सांगितले आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की इतर कारणांपेक्षा अल्कोहोल हे तुमच्या शरीरातील युरीक ऍसिड चे प्रमाण झपाट्याने वाढवते.

या आणि अशा अनेक अभ्यासात gout आणि अल्कोहोल सेवन, त्यामध्ये बीयर चे सेवन याचा सरळ सरळ संबंध असल्याचे स्पष्ट आहे.

किती मद्य सेवन केल्यावर युरीक ऍसिड वाढण्याचा धोका राहतो ?

पहिली गोष्ट म्हणजे मद्य सेवन कोणत्याही परिस्थितीत करूच नये. पण तुम्ही मद्यप्राशन करत असाल तर रक्तातील युरीक ऍसिड नियंत्रित राहण्याच्या दृष्टिकोनातून अत्यल्प म्हणजे अगदी माफक प्रमाणात करावे.

या मध्ये तुमच्या शरीरातील युरीक ऍसिड सुरक्षित पातळीवर राहण्यास मदत होते.

माफक प्रमाणात मद्य म्हणजे नेमके किती ?

युरीक ऍसिड ची पातळी नियंत्रित रहावी यासाठी तुम्ही माफक प्रमाणात मद्य सेवन ठेवण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. याला moderate drink असे म्हणतात. पण हे माफक प्रमाण म्हणजे नेमके किती ते बघूया.

  • सर्व वयोगटातील महिलांसाठी दररोज एक पेय (१ पॅक) पर्यंत.
  • ६५ आणि त्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषांसाठी दररोज दोन पेये (२ पॅक).
  • ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांसाठी दररोज एक पेय पर्यंत (१ पॅक).

४. आजारांमुळे वाढणारे युरीक ऍसिड

वरील सर्व कारणांव्यतिरिक्त, इतर आरोग्य परिस्थिति किंवा आजार सुद्धा तुमच्या शरीरातील युरीक ऍसिड वाढवू शकतात.

खालील पैकी आजारांमध्ये तुमचे युरीक ऍसिड वाढल्याचे आढळू शकते.

  • लठ्ठपणा
  • मधुमेह
  • उच्च रक्तदाब
  • उच्च कोलेस्टरॉल
  • हायपोथायरॉईडीझम (Hypothyroidism)
  • किडनी चे आजार (kidney diseases)
  • हेमोलाइटिक आजार (hemolytic anemia)
  • सोरायसिस (psoriasis)
  • Fatty liver disease.
  • Metabolic syndrome.

अनेक रिसर्च नुसार वरील आजारांमध्ये शरीरातील युरीक ऍसिड वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वरील पैकी कोणताही आजार असेल आणि युरीक ऍसिड वाढण्यासंबंधीत लक्षणे जर तुम्हाला जाणवत असतील तर त्याचे योग्य वेळेत निदान आणि उपचार घेणे बरे होईल.

संबंधित वाचा- यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

५. उत्तेजनात्मक पदार्थ

जसे प्रत्येक आजारांमध्ये त्या आजाराची तीव्रता वाढवणारे काही घटक असतात तसेच युरीक ऍसिड किंवा gout वाढण्यासाठी देखील काही घटक कारणीभूत असतात. याला triggering factor म्हणतात.

या triggering factor च्या संपर्कात येताच तुमचे युरीक ऍसिड झपाट्याने वाढून gout ची लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात.

यामधे खालील गोष्टी gout ची लक्षणे तीव्र करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

  • जाइंट च्या ठिकाणी गंभीर दुखापत होणे
  • संसर्ग (इन्फेक्शन)
  • शस्त्रक्रिया
  • क्रॅश आहार (अत्यंत कमी कॅलरी चा आहार)
  • औषधे वापरुन यूरिक ऍसिडची पातळी जलद कमी करणे
  • निर्जलीकरण (dehydration)

७. वय

तुमच्या ठराविक वयामध्ये युरीक ऍसिड वाढण्याची प्रवृत्ती अधिक असू शकते. उदाहरणार्थ, ३० ते ५० वयोगटातील व्यक्तींना युरीक ऍसिड वाढून gout होण्याची शक्यता अधिक असते. महिलांच्या बाबतीत मेनोपॉज (राजोनिवृत्ती) नंतर युरीक ऍसिड अधिक वाढल्याचे दिसते.

त्याचप्रमाणे मुलांमध्ये आणि तरुण प्रौढांमध्ये gout होण्याची शक्यता फारच कमी असते.

८. लिंग

स्त्री आणि पुरुषांमध्ये युरीक ऍसिड वाढण्याची प्रवृत्ती भिन्न असू शकते. जसे की रिसर्च नुसार पुरुषांमध्ये महिलांपेक्षा युरीक ऍसिड वाढण्याची प्रकरणे अधिक आढळतात.

९. अनुवंशिकता

अनुवंशिकते चा प्रभाव हा तुमच्या युरीक ऍसिड metabolism वर सुद्धा होतो. त्यामुळे अनुवंशीकतेनुसार युरीक ऍसिड वाढण्याची प्रवृत्ती देखील बदलते. जसे की जर तुमच्या रक्ताच्या नातेवाईकातील कुणाला gout चा आजार असेल तर तुम्हाला ही त्या आजाराचे निदान होण्याची शक्यता अधिक राहते.

थोडक्यात

युरिक ऍसिड वाढणे हा प्रकार फक्त तुमच्या जोइंट्स किंवा किडनीपर्यंत मर्यादित राहत नाही, तो शेवटी तुमच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम करू शकतो. या ब्लॉगमध्ये आपण युरिक ऍसिड वाढण्याची लक्षणे, कारणे, वय, लिंग, आहार आणि जीवनशैलीचे प्रभाव यावर सविस्तर चर्चा केली आहे.

यानंतर वेळ आणि गरज आहे ती तुम्ही निर्णय घेण्याची.निर्णय याचा की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत काय बदल करायला तयार आहात? युरिक ऍसिड नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि उत्तम सवयी कशा प्रकारे अंगिकारू शकता?

शेवटी थोडक्यात सांगतो, जर तुम्हाला तुमचे युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवायचे असेल, तर आहारातील बदल हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. जास्त प्युरीन असलेले पदार्थ टाळा, योग्य प्रमाणात मद्यसेवन करा, आणि सकारात्मक आणि निरोगी जीवनशैली अवलंबा.

तुमचे युरिक ऍसिडबद्दल अजून काही प्रश्न आहेत का? तुमचे अनुभव, विचार आणि शंका कमेंट्समध्ये शेअर करा आणि feedback सुद्धा द्या. एकमेकांकडून शिकायला नेहमीच काहीतरी नवीन असते.

आणि हो, तुमच्या युरीक अॅसिड ची काळजी खरंच घ्यायची असेल तर लगेच पाऊले उचला. तुमचा आहार आणि जीवनशैलीत बदल करा, युरिक ऍसिड वाढण्याची कारणे ओळखा आणि योग्य उपचार घ्या.

ब्लॉग आणि ब्लॉग वरील माहिती आवडली असेल तर कमेन्ट करून नक्की कळवा.

धन्यवाद !

FAQ’s

युरिक ऍसिड वाढल्याने काय होते?

युरिक ऍसिड वाढल्याने ते शरीरात काही ठिकाणी जमा होऊन तेथील आजार निर्माण करतात. उदाहरण, संधीरोग (gout), किडनी स्टोन.

यूरिक ऍसिडची पातळी कमी होण्यासाठी किती वेळ लागतो?

अनेक रिसर्च नुसार यूरिक ऍसिडची पातळी कमी होण्यासाठी साधारणता 2 वर्षे लागू शकतात.

युरिक ऍसिड कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या चांगल्या आहेत?

युरिक ऍसिड कमी करण्यासाठी कांदा, कोथिंबीर, बटाटे, टमाटे, काकडी, गाजर, लसूण हे पदार्थ खावे.

गाउट फ्लश करण्याचा सर्वात जलद मार्ग कोणता आहे?

गाउट फ्लश करण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे आणि द्रव पदार्थ,रसाळ फळे खाणे.

मला यूरिक ऍसिड असल्यास मी कोणते पदार्थ टाळावे?

तुमचे यूरिक ऍसिड वाढलेले असल्यास कोबी, पालक, मांसाहार विशेषकरून प्राण्यांचे अवयव आणि मासे हे पदार्थ खाण्याचे टाळावे.

ऍलोप्युरिनॉल युरिक ऍसिड क्रिस्टल्स विरघळते का?

ऍलोप्युरिनॉल युरिक ऍसिड क्रिस्टल्स विरघळत नाही. ही औषधी फक्त तुमच्या शरीरात अतिरिक्त युरिक ऍसिड तयार होण्यापासून थांबवते.

2 thoughts on “युरिक ऍसिड वाढण्याची कारणे”

Leave a Comment